प्रवासी रोडावल्याने यंदा उन्हाळी एसटींची संख्याही घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 06:28 AM2018-04-04T06:28:35+5:302018-04-04T06:28:35+5:30
परीक्षा संपल्यानंतर,बच्चे कंपनीला वेध लागतात. ते गावी जावून धमाल-मस्ती करण्याचे. त्यामुळे शाळेच्या त्या संपल्या रे संपल्या की बच्चे कंपनी गावी जाण्यासाठी सज्ज असतात. हीच बाब लक्षात घेऊन राज्य परिवहन विभागही सज्ज झाला असून सुट्यांमध्ये गावी तसेच देवदर्शनाला जाण्यासाठी विभागीय स्तरावर एसटींचे ‘उन्हाळी नियोजन’ केले आहे.
- पंकज रोडेकर
ठाणे - परीक्षा संपल्यानंतर,बच्चे कंपनीला वेध लागतात. ते गावी जावून धमाल-मस्ती करण्याचे. त्यामुळे शाळेच्या त्या संपल्या रे संपल्या की बच्चे कंपनी गावी जाण्यासाठी सज्ज असतात. हीच बाब लक्षात घेऊन राज्य परिवहन विभागही सज्ज झाला असून सुट्यांमध्ये गावी तसेच देवदर्शनाला जाण्यासाठी विभागीय स्तरावर एसटींचे ‘उन्हाळी नियोजन’ केले आहे. यानुसार,ठाणे विभागातून नियमीत धावणाऱ्या लांब पल्लयाच्या मार्गावरील १५० गाड्यांसह यंदा अतिरिक्त फक्त ४५ बस धावणार आहेत. मात्र,गतवर्षी ज्या मार्गांवर प्रवासी संख्या घटली आहे. त्या मार्गांचा या नियोजनात विचार न केल्याने यंदा २५ बसची संख्या घटल्याची माहिती विश्वनीय सूत्रांनी दिली.
‘सुरक्षित प्रवास,एसटीचा प्रवास’ हे राज्य परिवहन सेवेचे ब्रीदवाक्य आहे. दिवसेंदिवस एसटी ही खाजगी बसेसच्या स्पर्धेत उतरल्या आहेत. त्यातूनच एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. गणपती असो या होळी... हे सण लक्षात घेऊन परिवहन विभागाकडून जादा बसेस दरवर्षी सोडल्या जातात. तसेच उन्हाळ्यातही नागरिकांची गैरसोय होऊन नये आणि त्यांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी एसटी विभागामार्फत जादा बसेसचे नियोजन केले आहे. त्यानुसार, ठाणे विभागातील ७ डेपोतून १३ एप्रिल ते १३ जून असे दोन महिन्यांचे नियोजन केले गेले आहे. ते करताना मात्र,यंदा ठाणे विभागाने गतवर्षी केलेल्या ७१ जादा बसची संख्या यंदा थेट ४५ वर आणली आहे. गतवर्षी सोडलेल्या मार्गांचा विचार करताना, कोणत्या मार्गांवर प्रवाशांची संख्या रोडावली आहे. त्या मार्गांचा यंदा विचारच केला गेलेला नाही. त्यामुळे यंदा जादा बसची संख्या २५ ने घटली आहे. तसेच यंदा ४५ जादा बस दोन महिन्यांच्या कलावधीत धावणार आहेत. पहिल्या टप्प्यास १३ एप्रिलला सुरुवात होणार आहे.
जादा बस ९ ठिकाणांहून जाणार
राज्यातील २५ ठिकाणांची निवड केल्याने ठाण्यातून ९ ठिकाणी त्याप्रमाणे भिवंडी ५,कल्याण ३,विठ्ठलवाडी ४, भार्इंदर, बोरीवली, वाडा येथून प्रत्येकी एक अशा मार्गांवर या जादा ४५ बस धावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ग्रुप बुकिंग नाही
गणेशोत्सवाला कोकणात जाण्यासाठी जशी ग्रुप बुकिंग राबवली जाते. तशी उन्हाळी नियोजनात केलेली नाही. त्यामुळे आॅनलाइन बुकिंगद्वारे सीट नोंदणी करावी लागणार आहे.