यंदा पिझ्झा, बर्गर, डोसा राखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 12:26 AM2020-07-30T00:26:02+5:302020-07-30T00:27:30+5:30
कोरोनाचा फटका : आॅनलाइन राखी खरेदीकडे ग्राहकांचा कल
प्रज्ञा म्हात्रे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : रक्षाबंधननिमित्ताने दरवर्षी बाजारात ट्रेण्डी राख्या विक्रीसाठी येत असतात. यंदा फूड राख्यांची चलती पाहायला मिळत आहे. बच्चेकंपनीसाठी कार्टून राख्यांबरोबर पिझ्झा, बर्गर, डोसा, पिझ्झा अॅण्ड आइस्क्रीम राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. दुकानांपेक्षा या राख्यांची आॅनलाइन विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
रक्षाबंधन चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोनाचा फटका यंदा सणांना बसला असून सण साजरे करण्यावर बंधने आली आहेत. त्यामुळे बाजारातही कमी प्रमाणात राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. कोरोनामुळे आॅनलाइन खरेदीवर ग्राहकांनी अधिक भर दिला. त्यामुळे राख्यांचीही आॅनलाइन अधिक खरेदी होणार असल्याने ५० टक्के परिणाम दुकानातील राख्यांच्या खरेदीवर झाला असल्याचे दुकानमालक चंदरेश देढिया यांनी लोकमतला सांगितले. एरव्ही, एक महिन्यापासून राख्यांची खरेदी सुरू होते, परंतु सण जवळ आला असला, तरी अद्याप खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू झाली नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ठाण्यात दुकानांच्या नियमांचा परिणामही विक्रीवर झाला आहे. लहान मुलांसाठी पब्जी, शिनचान, पापापिग, व्हेनजर्स, सुपरब्रो, नॉटीब्रो, चिलब्रो, कुलब्रो, स्पिनर, डोरेमॉन, मोटू-पतलू, पांडा राखी, एलईडी राखी, रॉकेट, गणेशा राखी, बाळकृष्ण राखी तसेच मोठ्यांसाठी नेहमीप्रमाणे कुंदन राखी, गोंडा राखी, कलकत्ता जर्दोसी राखी, गोल्ड आणि सिल्व्हर प्लेटेड राखी, पिकॉक, ओम, रुद्राक्ष अशा विविध प्रकारांच्या आणि रंगांच्या राख्या बाजारात आल्या आहेत. १० रुपयांपासून या राख्यांची किंमत आहे.
परदेशात दरवर्षी राख्या पाठविल्या जातात. यंदा मात्र तशी खरेदी न झाल्याचे देढिया यांनी सांगितले. तसेच, राख्यांबरोबर बहिणीने भावाला आणि भावाने बहिणीला संदेश लिहिलेले भेटकार्डदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.