यंदा तीळगुळाची क्रिस्पी वडी, रंगीबेरंगी रेवडी, संक्रांतीसाठी सजला बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 12:00 AM2021-01-10T00:00:41+5:302021-01-10T00:01:00+5:30
‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत साजरा करण्यात येणारी मकर संक्रांत येत्या-येत्या गुरुवारी साजरी होणार आहे. वर्षभर सर्वच सण- उत्सवांवर कोरोनाचे सावट असून, संक्रांतीवरही ते दिसून येत आहे
ठाणे : येत्या गुरुवारी संक्रांत आल्याने त्या निमित्ताने तीळगूळ बाजारात विक्रीसाठी आले आहेत. असे असले, तरी कोरोनामुळे ४० टक्क्यांनी खरेदी-विक्रीवर परिणाम झाल्याची खंत दुकान मालकांनी व्यक्त केली. संक्रांतीसाठी यंदा ज्येष्ठांसाठी मऊ तीळगुळाचे लाडू आले आहेत, तर ज्यांना तीळगुळाच्या वड्या खायची हौस आहे, पण चावायला त्रास होतो, अशांसाठी यंदा क्रिस्पी वडी अन आग्र्याचा एक खास पदार्थ म्हणजे रंगीबेरंगी तीळगुळाची रेवडी बाजारात आली आहे.
‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत साजरा करण्यात येणारी मकर संक्रांत येत्या-येत्या गुरुवारी साजरी होणार आहे. वर्षभर सर्वच सण- उत्सवांवर कोरोनाचे सावट असून, संक्रांतीवरही ते दिसून येत आहे. ऐरवी घरोघरी तीळगुळाचे लाडू बनविण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा अद्याप अनेक ठिकाणी सुरुवात झाली नाही. आता खरेदी ही हळूहळू सुरू आहे. संक्रांत असल्याने बाजारात तीळगूळ विक्रीसाठी आला आहे.
कच्च्या मालाचे भाव वाढले असले, तरी काही दुकानमालकांनी तीळगुळाचे दर वाढविले नाहीत. गेल्या वर्षीपर्यंत तीळगुळाची आठवडाभर आधीपासूनच खरेदी होत असे, परंतु यंदा कोरोनामुळे ही खरेदी ओसरली असून, ४० टक्के फटका खरेदी-विक्रीला बसला आहे, तसेच कोरोनामुळे यंदा मोजकेच तीळगूळ लाडू आणि इतर पदार्थ बनविण्यावर भर असून, ऑर्डरनुसार बनविण्याची तयारी सुरू आहे, असे दुकानमालक केदार जोशी यांनी सांगितले.
दरम्यान, आग्राची प्रसिद्ध रेवडी ही ठाण्यात विकली जात आहे. तीळगूळ, ड्रायफ्रूट, शेंगदाणा, यांपासून बनविण्यात आलेली रंगीबेरंगी वडी ही लंबाकृती आहे. ४०० रुपये किलोने ही वडी मिळत आहे. त्यालाही मागणी असल्याचे सांगण्यात आले.