यंदा शहरात ढाकुमाकूम नाही, दहीहंडी नगरीत शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:27 AM2021-09-02T05:27:02+5:302021-09-02T05:27:02+5:30
ठाणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीच्या नगरीत मंगळवारी शुकशुकाट पाहायला मिळाला. एकीकडे मनसेने राज्य सरकारच्या निर्बंधानचे उल्लंघन केले ...
ठाणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीच्या नगरीत मंगळवारी शुकशुकाट पाहायला मिळाला. एकीकडे मनसेने राज्य सरकारच्या निर्बंधानचे उल्लंघन केले तर दुसरीकडे राज्य सरकारच्या आवाहनाला ठाण्यातील गोविंदा पथकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सामाजिक उपक्रमांवर भर दिला. त्यामुळे ठाण्यात ढाकुमाकूम नसल्याचे चित्र होते.
गोविंदा पथकांनीही मंगळवारी कोरोनाचे नियम पाळत पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा केला. ठाणेकरांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले तर सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या गोविंदा पथकांचे कौतुक केले. मात्र, मनसेने दहीहंडी साजरी करण्यावर ठाम निर्णय घेतल्याने पोलिसांचा मात्र मोठा बंदोबस्त होता. दुसरीकडे सरावच नसल्याने नियम मोडून उत्सव साजरा करण्यापेक्षा ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यांतील गोविंदा पथकांनी चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत करण्याची भूमिका मांडली. त्यामुळे आज संपूर्ण शहरात मंगळवारी सकाळपासून दहीहंडी उत्सवाचा शुकशुकाट होता. मात्र, श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद ठाणेकरांनी घरात साजरा केला. काही ठाणेकरांनी तर घरातच दहीहंडी बांधून कुटुंबासोबत या उत्सवाचा आनंद घेतला. त्यामुळे आजच्या दिवशी वाहतूककोंडी आणि ध्वनिप्रदूषणात भर पडली नसल्याचे जाणकारांनी सांगितले.