कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील यंदाचा नवरात्रोत्सव रद्द, जितेंद्र आव्हाड यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 03:51 PM2020-09-23T15:51:04+5:302020-09-23T15:52:51+5:30
काही उत्सव मंडळे नवरात्र उत्सव साजरा करतात त्यांनी देखील काळजी घ्यावी, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ज्या पद्धतीने गणोशोत्सव साजरा केला, त्याच धर्तीवर आता नवरात्रोत्सवही साजरा करण्याची गरज असल्याचे मत राज्याचे गृहनिर्माण जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.
कळवा मुंब्रा या विधानसभा मतदार संघातही यंदा जो काही सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे, तो देखील रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तर जे काही उत्सव मंडळे नवरात्र उत्सव साजरा करतात त्यांनी देखील काळजी घ्यावी, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
सप्टेंबर महिन्यात पुन्हा कोरोनाचा धोका वाढला आहे. रुग्ण वाढत असतांना मृत्यदर कमी आहे. मात्र म्हणून नवरात्र उत्सवाच्या काळात रात्री एकत्र येऊन भेटणे अयोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. गर्दी करु नका, गरब्याचे आयोजन टाळा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कळवा मुंब्रा या मतदार संघात मागील १० वर्षे मोठ्या उत्साहाने नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने गरब्याचेही आयोजन करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असल्याने येथील नागरिकांनी गरबा ठेवू नये किंवा नवरात्र उत्सवही रद्द करावा किंवा देवीचे आगमन कोणाच्या तरी घरात करावे, अशी विनंती केली होती. त्या अनुषंगाने कळव्यातील पारसिक नगरमध्ये होणारा नवरात्र उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढत आहे, त्यामुळे या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणे, दर्शनाला जाणो टाळा असे आवाहनही त्यांनी केले. परंतु तसे न केल्यास पुढील दिवाळीही धोक्यात जाऊ शकते असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे इतर मंडळांनी देखील त्या दृष्टीने विचार करुन नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा किंवा रद्द करावा असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.