येऊर: बार, रेस्टॉरंटवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई, पुन्हा बांधकाम केल्यास पुन्हा कारवाई

By अजित मांडके | Published: July 1, 2024 08:34 PM2024-07-01T20:34:39+5:302024-07-01T20:34:52+5:30

कायदेशीर कारवाईचाही आयुक्त सौरभ राव यांचा इशारा

Yeoor: Thane Municipal Corporation strike action on bars, restaurants, action again if re-construction | येऊर: बार, रेस्टॉरंटवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई, पुन्हा बांधकाम केल्यास पुन्हा कारवाई

येऊर: बार, रेस्टॉरंटवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई, पुन्हा बांधकाम केल्यास पुन्हा कारवाई

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रात सोमवारी चौथ्या दिवशीही कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत झालेल्या या कारवाईत येऊर येथील ०७ बार आणि रेस्टॉरंट निष्कासित करण्यात आले. सुमारे १ लाख ४२ हजार चौरस फूटांच्या क्षेत्रावर ही कारवाई करण्यात आली. परंतु काही ठिकाणी केवळ पावसाळी शेडवर कारवाई करतांना महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक दिसून आले. त्यामुळे या कारवाईबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.

सोमवारी येऊर येथे सात ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यांनी पुन्हा बांधकाम केले तर ते पुन्हा तोडले जाईल. तसेच, त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर, तोडकामाचा खर्चही त्यांच्याकडून वसूल करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या कारवाईची पाहणी सुरू असताना स्पष्ट केले.

लालाला बार, बॉम्बे डक, गारवा, लाईट हाऊस, सिक्रेट्स आॅफ येऊर, सफारी वूड्स, माऊंटन स्पिरिट या सात ठिकाणी ठाणे महापालिका आणि पोलिस यांनी संयुक्तपणे कारवाई केली. त्यासाठी दोन पोकलेन, पाच जेसीबी, पाच कटर, १०० कर्मचारी असा फौजफाटा येऊरमध्ये नेण्यात आला. उपायुक्त (स्थावर) मनीष जोशी, उपायुक्त (अतिक्रमण) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक  आदी वरिष्ठ अधिकारी या कारवाईच्यावेळी उपस्थित होते.

हवाई दल आणि नागरिकांनी केली होती तक्रार

सिक्रेट्स ऑफ येऊर या हॉटेलबद्दल हवाई दलाकडून तक्रार करण्यात आली होती. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याने या हॉटेलवर महापालिकेने कारवाई करून ते निष्कसित केले. तर, गारवा या रेस्टॉरंटबद्दल स्थानिक आदिवासींनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान स्थानिक नागरिकांशी आयुक्त राव यांनी संवाद साधला. आतापर्यंत, शाळा आणि महविद्यालयापासून १०० मीटरच्या आत असलेल्या एकूण ९८ पानटपऱ्या जप्त तसेच सिल करण्यात आल्या. तसेच, अनधिकृत हुक्का पार्लर, पब, बार अशा मिळून ३४ ठिकाणी पोकलेनच्या सहाय्याने निष्कासन कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी अनधिकृत, वाढीव शेड हटविण्यात आले.

Web Title: Yeoor: Thane Municipal Corporation strike action on bars, restaurants, action again if re-construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.