ठाण्यातील कुख्यात गुंडाची येरवडा तुरुंगात रवानगी, गंभीर स्वरूपाचे २४ गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 07:53 PM2017-08-20T19:53:51+5:302017-08-20T19:53:55+5:30

ठाण्यातील कुख्यात गुंड गणेश सुधाकर जाधव ऊर्फ काळा गण्या (२०, रा. लोकमान्यनगर, ठाणे) याच्यावर ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी महाराष्ट्र विघातक कारवाया प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली

Yerawada detention in the notorious gang of Thane, 24 serious offenses | ठाण्यातील कुख्यात गुंडाची येरवडा तुरुंगात रवानगी, गंभीर स्वरूपाचे २४ गुन्हे

ठाण्यातील कुख्यात गुंडाची येरवडा तुरुंगात रवानगी, गंभीर स्वरूपाचे २४ गुन्हे

Next

ठाणे, दि. 20 - ठाण्यातील कुख्यात गुंड गणेश सुधाकर जाधव ऊर्फ काळा गण्या (२०, रा. लोकमान्यनगर, ठाणे) याच्यावर ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी महाराष्ट्र विघातक कारवाया प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. याच कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्याची शनिवारी एक वर्षासाठी पुण्याच्या येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.

गण्यावर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी उकळणे, अपहरण, दरोडा आणि मारहाण करणे असे गंभीर स्वरूपाचे २४ गुन्हे वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यामुळेच पोलिसांच्या अभिलेखावरील ‘टॉप-२०’ गुन्हेगारांच्या यादीत त्याचा समावेश होता. त्याच्यावर यापूर्वीही ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई झाली होती. तरीही, त्याच्याकडून गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. त्यामुळेच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच इतर सणांच्या काळात परिसरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी त्याच्यावर एमपीडीएबरोबरच प्रथमच दुस-या जिल्ह्यात स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. त्याला ३० जुलै २०१७ रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर, सहायक पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने अटक केली होती. अटकेनंतर सुरुवातीला पोलीस कोठडी, त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते. न्यायालयीन कोठडीमुळे त्याची ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली होती. तो जामिनावर सुटण्यापूर्वीच त्याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव वर्तकनगर पोलिसांनी तयार केला होता. तो प्रस्ताव वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी आयुक्तांकडे पाठवला होता. गण्याची लोकमान्यनगर परिसरातील दहशत आणि अगदी नगरसेवकालाही ठार मारण्याची त्याने दिलेली धमकी या सर्वच पार्श्वभूमीवर त्याला न्यायालयीन कोठडीत असतानाच आयुक्तांनीही त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश दिले. त्यामुळेच त्याची आता ठाणे कारागृहातून येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
गण्याच्या अटकेनंतर लोकमान्यनगरचे राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे, दिगंबर ठाकूर, राधाबाई जाधवर आणि वनिता घोगरे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी वागळे विभागाचे सहायक आयुक्त महादेव भोर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरधर यांचा सत्कार केला होता. त्याच्यावरील स्थानबद्धतेच्या कारवाईचेही नगरसेवकांसह स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Yerawada detention in the notorious gang of Thane, 24 serious offenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.