येस बँकेत ग्राहकांची उडाली झुंबड, कर्मचाऱ्यांशी उडाले खटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 01:01 AM2020-03-07T01:01:31+5:302020-03-07T01:01:49+5:30
पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या रोषालाही बँक कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागले. मात्र, प्रत्येक शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
ठाणे : रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लादल्यामुळे जिल्हाभरातील बँकेच्या शाखांबाहेर शेकडो ग्राहकांची शुक्रवारी एकच झुंबड उडाली. खात्यातून केवळ ५० हजार रुपयेच काढता येत असल्यामुळे जी मिळेल ती रक्कम काढण्यासाठी सकाळीच खाते असलेल्या शाखेमध्ये ग्राहकांनी धाव घेतली. पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या रोषालाही बँक कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागले. मात्र, प्रत्येक शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, बदलापूर अशा सर्वच ठिकाणी बँक शाखांच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी ८ वाजल्यापासून ग्राहक रांगेत उभे राहिले होते. मात्र, बराच वेळ झाला तरी काही ठिकाणी पैसे देण्यासाठी काउंटरच सुरू झाले नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. तास-दोन तासांनंतर रांगेत काढल्यानंतर काउंटर सुरू झाले. एटीएम, नेटबँकिंग बंद झाल्याने ग्राहकांमध्ये घबराट पसरली होती. बँक कर्मचारी ग्राहकांना ‘पैसे काढण्याची घाई करू नका. तुमचे पैसे सुरक्षित आहेत. त्यांची मुदतठेव करा’ असे सल्ला देत होते. मात्र, कोणीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यावरून त्यांची बँक कर्मचाºयांशी शाब्दिक चकमकही उडाली. एकीकडे ग्राहकांची गर्दी ववाढत असताना काही शाखांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने परिस्थिती आणखी चिघळली. सकाळपासून रांगेत उभे राहूनही काही जणांना पैसे न मिळाल्याने त्यांची निराशा झाली. त्यांना टोकन देऊ न घरी पाठवण्यात आले. पैशांची जशी उपलब्धता असेल, तसे ग्राहकांना ते देण्यात येतील, असे बँक कर्मचारी सांगत होते.
संबंधित वृत्त/आतील पानांत
>इतर बँकांनी साधली संधी
आर्थिक अडचणीत सापडलेल्या येस बँकेचे ग्राहक आपल्याकडे वळवण्यासाठी इतर बँकांनी ही नामी संधी साधली. काही बँकांनी तिथेच आपले काउंटर थाटले होते. या काउंटरवरील कर्मचारी पैसे काढून बाहेर येणाºया ग्राहकांना आपल्या बँकेत खाते खोलण्याची विनंती करताना दिसत होते. व्यावसायिक चढाओढ पाहून हे ग्राहकही आश्चर्य व्यक्त करत होते.