होय, ठाणेकर याला तुम्हीच जबाबदार...; पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना धाब्यावर
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 24, 2023 03:43 PM2023-09-24T15:43:56+5:302023-09-24T15:44:27+5:30
शनिवारी पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले आणि दुसऱ्या दिवशी तलावपाळीवर रस्त्यावर फेकलेले निर्माल्यचे ढिगारे पाहायला मिळाले.
ठाणे : पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा राबविणाऱ्या ठाणे महापालिकेने निर्माल्यय व्यवस्थापनाची एकीकडे व्यवस्था केली असता दुसरीकडे बेजबाबदार ठाणेकरांनी या निर्माल्यचा कचरा केला असल्याचे दृश्य सकाळी ठाणे तलावपाळी येथे पाहायला मिळाले. पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना धाब्यावर बसवत रस्त्यावर निर्माल्य फेकून दिल्याचे पाहायला मिळाले. सकाळी सफाई कामगार हे निर्माल्य साफ करताना दिसत होते. त्यात प्लास्टीकच्या पिशव्याही पाहायला मिळाल्या.
शनिवारी पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले आणि दुसऱ्या दिवशी तलावपाळीवर रस्त्यावर फेकलेले निर्माल्यचे ढिगारे पाहायला मिळाले. पर्यावरणप्रेमी सतिश चाफेकर यांनी सकाळचे इतरत्र फेकलेले निर्माल्यचे विदारक चित्र सोशल मीडियावर पोस्ट करत याविरोधात आवाज उठवला असून काही पर्यावरणप्रेमींनी त्यांच्या पोस्टचे समर्थन केले आहे.
निर्माल्य या पवित्र शब्दाचा कचरा केल्याचे प्रफुल वाघोले यांनी म्हटले आहे तर विनय राजवाडे यांनी आपल्या धर्मात असे शिकवतात का? आपण कधी शहाणे होणार? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. एकीकडे काही गणेशभक्तांकडून निर्माल्य संकलनाला प्रतिसाद दिला जात असताना दुसरीकडे बेजबाबदार ठाणेकर असे वागताना दिसत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.