स्वामी विवेकानंद शाळेत योग उत्सव; ओंकार साधना, अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 01:08 AM2020-02-06T01:08:34+5:302020-02-06T01:09:47+5:30
विविध व्यायाम प्रकार सादर
डोंबिवली : रथसप्तमीनिमित्त स्वामी विवेकानंद, दत्तनगर प्राथमिक शाळेत सोमवारी योग उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सूर्यनमस्कारातील एक असलेला चंद्रनमस्कार, विविध व्यायाम प्रकार व योगासने यांचे सादरीकरण करण्यात आले.
सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यानंतर ओंकार प्रार्थना व अथर्वशीर्ष यांचे सामूहिक पठण झाले. त्यानंतर, विद्यार्थ्यांनी शंखनाद केला. मंत्रोच्चारांसह इयत्ता पहिली ते सातवीच्या ४५० विद्यार्थ्यांनी व काही पालकांनीही सूर्यनमस्कार, योगासने केली. त्यानंतर, काही विद्यार्थ्यांनी मंत्रोच्चारांसह चंद्रनमस्कार सादर केले. यानंतर, बालवर्गाच्या मुलांनी योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केली. शेवटी, प्राथमिक विभागाच्या काही विद्यार्थ्यांनी चित्तथरारक योगासने सादर करून सगळ्यांना अचंबित केले. हा योगसोहळा पाहून प्रमुख पाहुणे व प्रसिद्ध योग शिक्षक विजय बने भारावून गेले.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सहकार्यवाह प्रमोद उंटवाले, शाळा समितीचे अध्यक्ष विद्याधर शास्त्री, माधवी कुलकर्णी, मुख्याध्यापिका शैलजा चौधरी, पूर्व प्राथमिक विभागाच्या रश्मी पवार, कीर्ती मुरादे आदी उपस्थित होते. दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नयना पाटील व शाळेची विद्यार्थिनी मृणाल पाटील यांनी केले. तर, विद्या जोगळेकर यांनी ऋणनिर्देश केला. शाळेची माजी विद्यार्थिनी आकांक्षा बावस्कर हिने कार्यक्रमासाठी बासरी वादन केले.