योग प्राण विद्येमुळे शारिरीक नाही तर मानसीक आजारही बरे होतात : सुविर सबनीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 05:11 PM2019-10-10T17:11:43+5:302019-10-10T17:25:59+5:30
अत्रे कट्ट्यावर शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा मेळ ' हिलींग मेडिटेशन' द्वारा कसा साधावा हे सांगणारा आनंदाचा मूलमंत्र हा कार्यक्रम आयोजित केला होता.
ठाणे: योग प्राण विद्या हे प्राचीन शास्त्र असून त्यावर ३० ते ४० वर्षे संशोधन झाले आहे. योग प्राण विद्येने कोमा, कॅन्सरसारखे रुग्णही बरे होतात. या विद्येमुळे शारिरीक नाही तर मानसीक आजारही बरे होतात, अगदी तुटलेली नातीही जुळू शकतात. योग प्राण विद्येचा परिणाम शहर, वास्तू, व्यवसायावरही होतो असे मत योग प्राण विद्या संघटनेचे ग्लोबल हिलर सुविर सबनीस यांनी व्यक्त केले. आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्यावतीने अत्रे कट्ट्यावर ‘आनंदाचा मुलमंत्र’ या विषयावर खुले चर्चासत्र आयोजित केले होते.
यावेळी सबनीस यांनी योग प्राण विद्येची माहिती देत अनेक प्रसंग सांगितले. ते म्हणाले, प्राणशक्तीमुळे बरे करणे हे शास्त्र ही आहे आणि ती कला ही आहे. योग प्राण विद्या हे औषधाची जागा घेऊ शकत नाही. औषध चालू ठेवून योग प्राण विद्येचे हिलींग देता येते. मनुष्याचे जसे शरीर असते तसे प्राणमय कोश देखील असतो आणि तो शरिरावर नियंत्रण ठेवत असतो. मनुष्यात स्वत:चे शरीर बरे करण्याची ताकद असते पण आपण काही झाले की औषधे घेतो, औषधांना शरण जातो आणि त्यात स्वत:ला बरे करण्याचे विसरुन जातो असेही त्यांनी सांगितले. हिलींगचा कमी वयाच्या व्यक्तीवर जास्त वयाच्या व्यक्ती पेक्षा लवकर परिणाम होतो. हिलींग हे केवळ शारिरीक, मानसीक आजारासाठी असतेच असे नाही तर नाती, शहर, वास्तू, व्यवसाय या सर्वांवरही ते करता येते हे सांगताना त्यांनी ते योग प्राण विद्येकडे कसे वळले हे सांगितले. सीएच्या शेवटच्या वर्षाला असताना माझअया आईला सांधेदुखीचा त्रास सुरू झाला. औषधोपचार सुरू होते पण औषधेही काम करीत नव्हती. हिलर घरी यायचे ते हिलींग द्यायचे नंतर हातापायाची सूज उतरु लागली मग या विषयाकडे पाहण्याची माझी उत्सुकता वाढली. २०१२ मध्ये मी ही विद्या शिकलो. मग मी स्वत:च आईला हिलींग द्यायला सुरूवात केली, तिला बरे वाटू लागले. त्यानंतर एका दोघांवर प्रयोग केले ते खुश झाले आणि माझा आत्मविश्वास वाढू लागला. त्यावेळी सीए सोडायचा निर्णय घेतला तेव्हा आई वडिल हादरले होते. पण मी या विद्येचीच निवड केली. आनंदाचा मूलमंत्र देताना ते पुढे म्हणाले, क्षमा करायला शिका आणि हेच शरिराचे मोठे हिलींग आहे. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी ग्रुप हिलींग दिले. सुरूवातीला परिचय अत्रे कट्ट्याच्या संगीता कुलकर्णी तर आभार प्रदर्शन स्मिता पोंक्षे यांनी केले.