योगाचार्य अण्णा व्यवहारे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 05:31 AM2019-08-25T05:31:28+5:302019-08-25T05:31:36+5:30
योगाचार्य सहस्रबुद्धे गुरु जींच्या प्रेरणेने अंतर्बाह्य योगमय झालेल्या अण्णांनी घंटाळी मित्र मंडळाचा योग विभाग अथक प्रयत्नांनी सुरू केला.
ठाणे : ४५ वर्षांहून अधिक काळ योगाचा प्रचार आणि प्रसार करणारे ज्येष्ठ योगाचार्य अण्णा ऊर्फ श्रीकृष्ण व्यवहारे यांचे शनिवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि सुना असा परिवार आहे. शनिवारी सायंकाळी त्यांच्यावर जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. समस्त ठाणेकर त्यांना अण्णा म्हणून ओळखत.
योगाचार्य सहस्रबुद्धे गुरु जींच्या प्रेरणेने अंतर्बाह्य योगमय झालेल्या अण्णांनी घंटाळी मित्र मंडळाचा योग विभाग अथक प्रयत्नांनी सुरू केला. ठाण्याच्या एका गल्लीत सुरू झालेला योगा त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेला. सर्वसामान्य माणूस ते बंदी, दिव्यांगांनाही त्यांनी योगाचे प्रशिक्षण दिले. २६ जानेवारी १९६५ रोजी घंटाळी मित्र मंडळाची स्थापना केली. त्या माध्यमातून आणि योगसाधनेतून त्यांनी हजारो कार्यकर्ते घडवले.
पश्चिम रेल्वेत इमानेइतबारे नोकरी करून त्यांनी योगसाधना अव्याहृत सुरूच ठेवली. निवृत्तीनंतर योगासाठी त्यांनी आपले जीवन वाहून घेतले. त्यांनी भारतातील विविध मान्यताप्राप्त योग विद्यालयांतून योगशिक्षकवर्ग यशस्वीरीत्या पूर्ण केले. १९७८ मध्ये स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी त्यांना योगाचार्य ही पदवी बहाल केली. १९८९ मध्ये त्यांनी घाटकोपरला गुजरातीबांधवांच्या मदतीने योगशाखा काढली. त्यानंतर गोवा, नेपाळ येथेही योगकेंद्रे सुरू केली. ठाण्याच्या कारागृहातील बंदीसाठी त्यांनी योगाचे वर्ग घेतले.
मुंगेरच्या बिहार योग विद्यालयाने बिहारमधल्या आठ तुरु ंगांतील १६५ बंदींनी प्रशिक्षित योगशिक्षक म्हणून घडवले. या प्रकल्पावरील शोधनिबंधास १९८८ साली बँकॉक येथे भरलेल्या जागतिक योग परिषदेत रौप्यपदक प्राप्त झाले. स्मृतिसंवर्धन, एकाग्रतेकरिता त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मेधासंस्कार प्रकल्प सुरू केला. याशिवाय, अग्निशमन दलातील जवान, बॅडमिंटनपटू, आदिवासी मुले, तबलावादक अशा अनेक घटकांपर्यंत त्यांनी योगाचे महत्त्व रुजवले. गर्भवती स्त्रियांसाठी त्यांनी योगांकुर तसेच स्त्रियांच्या मासिकपाळीच्या तक्रारींसाठी त्यांनी आनंदयोग, अथध्यानम्, प्राणायामदर्शन, मेधासंस्कार हे विशेष योगवर्ग सुरू केले. योगतरंग हे मासिकही सुरू केले. १९७८ पासून २०१० पर्यंत त्यांनी १७ योगसंमेलनांचे आयोजन केले. २००२ च्या योग महोत्सवात स्वामी निरंजनानंद सरस्वती यांनी अण्णांना कर्मसंन्यासाची दीक्षा देऊन त्यांचे स्वामी सत्यकर्मानंद असे नामकरण केले. मुंगेर येथे भरलेल्या जागतिक योग संमेलनात बिहार स्कूल आॅफ योगाने अण्णांना सुवर्णयोगी ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला होता.