तुम्ही, या असल्या घाणेरड्या पाणीपुऱ्या तर खात नाही ना? जमिनीवर पीठ मळून, कामगार लाटत होते पुऱ्या
By धीरज परब | Published: December 2, 2023 08:31 AM2023-12-02T08:31:54+5:302023-12-02T08:32:41+5:30
Pani Puri : जमिनीवरच पीठ मळून त्याचे गोळे केले जात होते. एका कोपऱ्यात तळण्यासाठी काळ्याकुट्ट अवस्थेतील कढई व सभोवताली घाणेरड्या अवस्थेतील भांडे होते. गाळ्यात सर्वत्र घाण होतीच शिवाय बाहेर उघडे गटार होते.
- धीरज परब
मीरा रोड - जमिनीवरच पीठ मळून त्याचे गोळे केले जात होते. एका कोपऱ्यात तळण्यासाठी काळ्याकुट्ट अवस्थेतील कढई व सभोवताली घाणेरड्या अवस्थेतील भांडे होते. गाळ्यात सर्वत्र घाण होतीच शिवाय बाहेर उघडे गटार होते. कोणतीही स्वच्छता न ठेवता फक्त अंडरवेअरवरच कामगार पाणीपुरीच्या पुऱ्या बनवत असल्याचा कारखाना भाईंदरमध्ये उघडकीस आला. मनसेने त्याचा व्हिडीओ समोर आणल्यावर एफडीए अधिकाऱ्यांनी धाव घेत कारवाई सुरु केली आहे.
भाईंदर पूर्वेच्या आझादनगर भागात गलिच्छ ठिकाणी एका गाळ्यात पाणीपुरीची पुरी बनवणारा कारखाना चालवला जात असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याच्या आधारे मनसेचे सचिन पोपळे, अभिनंदन चव्हाण, रॉबर्ट डिसोझा, संकेत आर्डे, साहिल उघडे आदी दोन दिवस या कारखान्याचा शोध घेत होते. आझादनगरच्या गल्ली क्र. २, दशरथ नगर भागात अखेर तो पाणीपुरीचा कारखाना सापडला. तेथे ६ कामगार होते. सोबतची छायाचित्रे पुरेशी बोलकी आहेत.
आरोग्याशी खेळ
सचिन पोपळे यांनी अन्न व औषध प्रशासन आणि नवघर पोलिसांकडे तक्रार दिली. अधिकाऱ्यांनी येऊन तपासणी व पंचनामा केला. अतिशय गलिच्छ अवस्थेत परप्रांतीय कामगार पुऱ्या बनवत असून लोकांच्या जीवाशी आणि आरोग्याशी हा खेळ सुरू आहे. या कारखान्यास अन्न व औषध प्रशासनाचा परवाना नसल्याचे पोपळे यांनी सांगितले.