‘तू अभ्यासाकडे लक्ष दे, टेन्शन घेऊ नकोस’, मुख्यमंत्र्यांचा त्या मुलाला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 09:42 AM2023-02-17T09:42:18+5:302023-02-17T09:42:57+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाला सल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : महिन्याच्या सात तारखेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे होणारे वेतन मागील काही महिन्यांपासून उशिराने होत आहेत. याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच कुटुंबातील लहान चिमुकल्यांवरसुद्धा होत आहे. अशाच एका एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने आपल्या कुटुंबीयांच्या वेदना मांडत चक्क मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांची सभास्थळी भेट घेत त्यांना पत्र दिले. यावेळी, ‘तू अभ्यासाकडे लक्ष दे, टेन्शन घेऊ नकोस’ असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी त्या विद्यार्थ्याला दिला. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन लवकरात लवकर करण्याचे आश्वासनही दिले.
एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपानंतर व सत्ताबदल झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांना १५ तारीख उलटूनही वेतन मिळत नाही. या पार्श्वभूमीवर एसटी आगारात वाहक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मुलगा तेजस याने चक्कीनाका परिसरात मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेच्या ठिकाणी त्यांची भेट घेतली.
पत्राद्वारे मांडल्या व्यथा
तेजस शाळेतून परस्पर सभेच्या ठिकाणी गेला. त्यावेळी त्याला जे सुचले ते त्याने एका कागदावर लिहीत तो कागद मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला, अशी माहिती तेजसच्या वडीलांनी लोकमतला दिली.
एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने आपल्या वेदना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी त्याचे मनोबल वाढविले.