बाथरुममध्ये जास्त वेळ घालवताय, तुम्हालाही होईल ‘गिझर सिंड्रोम’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 10:05 PM2017-10-30T22:05:06+5:302017-10-30T22:05:42+5:30
एका २५ वर्षाच्या तरुणाला घरी आंघोळ करत असताना अचानक डोळ्यांसमोर अंधार येऊन चक्कर आली. त्याला त्वरित मुलुंड येथील रुग्णालयात नेण्यात आले.
मुंबई - एका २५ वर्षाच्या तरुणाला घरी आंघोळ करत असताना अचानक डोळ्यांसमोर अंधार येऊन चक्कर आली. त्याला त्वरित मुलुंड येथील रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय उपचार घेतल्यामुळे दीर्घकाळानंतर तो या आजारातून बरा होऊ शकला. उपचारादरम्यान रुग्णालयातील डॉक्टरांच्या लक्षात आले की, त्याला लूज स्टूल्सचा सुद्धा त्रास होता. सततच्या गिझर वापराच्या सवयीमुळे सध्या ‘गिझर सिंड्रोम’ हा नवा आजार डोके वर काढतो आहे, त्यामुळे बाथरुममध्ये अधिक वेळ घालवणाºयांनी वेळीच काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
‘गिझर सिंड्रोम’ हा आजार बाथरुममध्ये अधिक काळ घालवणा-या लोकांमध्ये दिसून येतो. बाथरुम्समध्ये बसवलेल्या गॅस गिझर्समधून बाहेर पडणा-या कार्बन डायआॅक्साइडच्या बाधेमुळे हा आजार होतो. गिझर सिंड्रोमचे निदान करण्यात आलेले रुग्ण २० ते ४० वर्षे वयोटातील होते. त्यांना जवळपास ३० ते ४५ मिनिटे बाथरुममध्ये राहण्याची सवय असल्याचे दिसून आले. चक्कर येणे, बेशुद्ध होणे आणि डोळ्यांसमोर अंधार येणे ही सिंड्रोमची लक्षणे आहेत. हा आजार दीर्घकाळापर्यंत राहिल्यास व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकते किंवा कार्बन डायआॅक्साइडच्या बाधेमुळे हृदयक्रिया बंद पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असे डॉ. संदीप गोरे यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांत १२ रुग्ण या आजाराचे बळी ठरल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. डॉ. गोरे यांनी सांगितले की, बाथरुममध्ये दीर्घकाळार्यंत राहण्याच्या सवयीमुळे एपीलेप्सीने पीडित २५ वषार्ची महिला आणि पार्किसन्स आजाराने पीडित ३१ वषार्ची महिला यांच्या केसेस आल्या होत्या. उपचारानंतर त्या सामान्य जीवन जगत आहेत. या आजाराचे इतर परिणाम जाणून घेण्यासाठी 'ब्लड-गॅस अॅनालिसिस' व इतर सामान्य चाचण्या केल्या जातात. या केसेससंदर्भात ईआर फिजिशियन्स व न्यूरोलॉजिस्ट्स आॅक्सिजन थेरेपीसह उपचार करतात. पण वेळेवर व योग्य उपचार केले नाही तर परिस्थिती जीवघेणी होऊ शकते किंवा दीर्घकाळापर्यंत आजाराचे साइड इफेक्ट्स दिसू शकतात.
या समस्येच्या हाताळणीबाबत बोलताना डॉ. गोरे म्हणाले, घरातील साधी उपकरणे योग्यरित्या वापरली नाही आणि योग्य ती काळजी घेतली नाही, तर ते अत्यंत धोकादायक ठरू शकते आणि त्याचा हृदय, श्वसन प्रक्रियेवर आणि मज्जासंस्थेवर दुष्परिणाम होऊ शकतो. अनेक लोकांना, तसेच डॉक्टर्सना देखील या आजाराबाबत माहीत नाही. हा धोका टाळण्यासाठी बाथरुम्समध्ये पुरेशा प्रमाणात हवा खेळती ठेवणे, हाच मूलभूत उपाय आहे.