तुम्ही खड्ड्यांतूनच करा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 03:55 AM2018-09-01T03:55:03+5:302018-09-01T03:55:33+5:30
एमएमआरडीएची इच्छा : लोकनगरी रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष, वाहनचालक झाले त्रस्त
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या हद्दीतील पाच रस्त्यांचे काँक्रिटीकरण एमएमआरडीएमार्फत केले जाणार आहे. त्यासाठी या रस्त्याचे हस्तांतरण एमएमआरडीएकडे करण्यात आले आहे. मात्र, काम सुरू करणे तर दूरच, ते रस्ते वाहतुकीसाठी योग्य करण्यासाठीही एमएमआरडीए पुढाकार घेत नसल्याचे समोर आले आहे. पालिकेने हा रस्ता हस्तांतरित केल्याचे कारण पुढे करून रस्तादुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. एमएमआरडीए रस्त्याच्या दुरुस्तीबाबत गंभीर नसल्याने वडवली वेल्फेअर सेंटर ते लोकनगरी या रस्त्याची दुरुस्ती रखडलेली आहे.
सरकारच्या दोन विभागांतील समन्वयाचा अभाव असल्यावर काय परिस्थिती निर्माण होते, याची प्रचीती लोकनगरी रस्त्यावर अनुभवता येत आहे. वडवली वेल्फेअर सेंटर ते लोकनगरी ग्राउंडपर्यंतचा रस्ता हा वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावरून आनंदनगर औद्योगिक वसाहतीत शेकडो कामगार वाहने घेऊन जात असतात. त्यामुळे नागरिकांसह कामगारांनाही खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. लोकनगरी रस्त्यामुळे संपूर्ण पूर्व भाग जोडला गेला आहे. त्यामुळे हा रस्ता सर्वाधिक रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण हे एप्रिल महिन्यातच मंजूर झाले आहे. मात्र, अजूनही एमएमआरडीएने काम सुरू केलेले नाही. त्यामुळे एमएमआरडीएने संबंधित कंत्राटदाराकडून आहे तो रस्ता किमान दुरुस्त करणे गरजेचे आहे. मात्र, चार महिन्यांत एकदाही एमएमआरडीएने या रस्त्याची दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्ता पालिकेचा असला, तरी कामासाठी एमएमआरडीएकडे असल्याने पालिकाही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देत नाही. नागरिकांनाही याच खराब रस्त्यातून मार्ग काढत जावे लागत आहे.
अंबरनाथ नगरपालिकेने तीन वर्षे देखभाल दुरुस्तीच्या नावाने हा रस्ता कंत्राटदाराला काम करण्यासाठी दिला होता. मात्र, या रस्त्याला पाच वर्षे झाली असून त्याच कंत्राटदाराकडून काम करून घेण्यात येत आहे. तीन वर्षे देखभाल दुरुस्ती केल्यावर कंत्राटदाराची जबाबदारी संपलेली असतानाही पालिका प्रशासन नव्या प्रस्तावाला मंजुरी देत नव्हते. त्यातच, एमएमआरडीएकडे हा रस्ता गेल्यावर पालिकेने संपूर्ण अंग काढून घेतल्याने गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती होईल, याची शक्यता नाही.
नेमकी तक्रार कुणाकडे करावी
एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कंत्राटदारामार्फत या रस्त्याची दुरुस्ती करून रस्ता किमान वाहतुकीसाठी योग्य करणे गरजेचे होते. मात्र, ते कामही केले जात नसल्याने नेमकी तक्रार करावी कुणाकडे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
संबंधित यंत्रणांनी त्वरित दखल घेऊन रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी केली जात आहे.