गणपतीचे चोरीला गेलेले दागिने मिळणार गणेशोत्सवापूर्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:48 AM2021-09-04T04:48:24+5:302021-09-04T04:48:24+5:30
डोंबिवली : केडीएमसीचे माजी नगरसचिव चंद्रकांत माने यांचे पूर्वेतील छेडा रोडवरील पुंडलिक स्मृती बिल्डिंगमधील बंद घर फोडून चोरट्यांनी घरातील ...
डोंबिवली : केडीएमसीचे माजी नगरसचिव चंद्रकांत माने यांचे पूर्वेतील छेडा रोडवरील पुंडलिक स्मृती बिल्डिंगमधील बंद घर फोडून चोरट्यांनी घरातील गणपतीचे चांदीचे दागिने आणि वस्तू चोरून नेल्याची घटना एप्रिलमध्ये घडली होती. या गुन्ह्याचा छडा लावण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. घरफोडी गुन्ह्यातील नुकत्याच अटक केलेल्या सूरज चव्हाण या सराईत चोरट्यानेच हे दागिने चोरल्याचे तपासात उघड झाले आहे. दरवर्षी घरगुती गणेशोत्सवानिमित्त वापरात असलेले परंतु, चोरीला गेलेले दागिने गणेशोत्सवापूर्वीच मिळणार असल्याने माने कुटुंबीयांनी पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत.
माने हे कुटुंबासमवेत कोकणात गावी असल्याने त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी घराच्या खिडकीचे लोखंडी गज तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि कपाट फोडून आतील देवाच्या चांदीच्या मूर्ती आणि दागिने तसेच चांदीच्या वस्तू चोरल्या होत्या. याबाबत माने यांचा मुलगा प्रशांत याने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास रामनगर पोलीस व कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही सुरू होता.
लवकरच करणार स्वाधीन
- ठाकुर्ली ९० फुटी रोडवर पोलिसांनी गस्तीदरम्यान संशयावरून सूरज चव्हाण याला रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक दाभाडे यांच्या पथकाने अटक केली.
-यात पाच घरफोडीचे गुन्हे चव्हाण याच्याकडून उघडकीस आले. यात माने यांच्या घरात झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा समावेश आहे.
- चोरीला गेलेल्या चांदीच्या दागिन्यांपैकी काही दागिने हस्तगत करण्यात आले असून, लवकरच ते माने कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जाणार आहेत.
-----------------------------------------------------------