एसएमएसद्वारे कळणार तुमच्या अर्जाची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:45 AM2021-08-14T04:45:05+5:302021-08-14T04:45:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण तहसील कार्यालयात तुम्ही जातीचा दाखल्यासाठी अर्ज केल्यावर तो कोणत्या टेबलावर पोहोचला आहे, त्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण तहसील कार्यालयात तुम्ही जातीचा दाखल्यासाठी अर्ज केल्यावर तो कोणत्या टेबलावर पोहोचला आहे, त्याची सद्य:स्थिती काय आहे, तुमचा दाखला तयार होईपर्यंतची त्याची इत्थंभूत माहिती तुमच्या मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे १५ ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरू करण्यात येत आहे. ती यशस्वी होताच कल्याण उपविभागीय कार्यक्षेत्रात राबविली जाईल, अशी माहिती कल्याणचे उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी दिली.
भांडे पाटील म्हणाले की, कल्याण तहसील कार्यालयार्तंगत १०० गावे, केडीएमसीतील २७ गावे तसेच कल्याण, डोंबिवली, आंबिवली, शहाड, टिटवाळा, कोपर ही शहरे येतात. या तहसील हद्दीतील एखाद्या नागरिकाने त्याचा जातीचा दाखला काढण्यासाठी तहसील कार्यालयातील ‘आपले सरकार’ या पोर्टलवर अर्ज केला, तर त्याची सर्व स्थिती त्याला एसएमएमद्वारे कळविली जाणार आहे. अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाईन केला. तसेच ऑफलाइनद्वारे मागणी केली, तरी त्याला त्याचे अपडेट उपलब्ध होतील. अर्ज केल्यावर, त्याची छाननी तहसीलदारांकडे झाल्यावर, त्यानंतर तो अर्ज उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आल्यावर, तेथे त्याची छाननी सुरू असताना आणि त्यानंतर अर्ज मंजूर होऊन दाखला तयार झाल्यावर अशा प्रत्येक टप्प्यावर अर्जाची स्थिती अर्जद्वारे एसएमएसद्वारे समजेल. शिवाय अर्ज केल्यापासून २१ दिवसांत जातीचा दाखला मिळणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतींसाठी या दाखल्याची आवश्यकता असते. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी एसएमएस सेवा सुरू केली जात आहे.
टप्प्याटप्प्याने चारही दाखल्यांचे अपडेट मिळणार
भांडे पाटील पुढे म्हणाले, नागरिकांना प्रामुख्याने चार प्रकारचे दाखले महसूल विभागाकडून अपेक्षित असतात. त्यात जातीचा आणि नॉन क्रिमिलेअर या दाखल्याचा अंतिम निर्णय हा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अखत्यारित येतो. उत्पन्नाचा आणि रहिवासाचा दाखला हा तहसीलदार पातळीवर दिला जातो. सुरुवातीला जातीच्या दाखल्याच्या अपडेट एसएमएसद्वारे कळविण्याची सुविधा सुरू होत आहे. टप्प्याटप्प्याने चारही दाखल्यांचे अपडेट तहसील कार्यालयांतर्गत ‘आपले सरकार’च्या सर्व केंद्रांवर उपलब्ध करून दिले जातील.
-----------