पुढच्या बाकावर बसायला मिळणार नाही, राष्ट्रवादीत येणाऱ्यांना आव्हाडांचा इशारा
By महेश गलांडे | Published: February 21, 2021 09:26 PM2021-02-21T21:26:22+5:302021-02-21T21:32:01+5:30
आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाणे आणि नवी मुंबईतील जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम आणि उद्घाटन सोहळ्यांना हजेरी लावली.
ठाणे - राज्यातील महाविकास आघाडी सरकारची कामगिरी उत्तम आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कोरोना काळातही चांगल काम सरकारने केलंय. आपल्या सरकारच्या काळात माजी मंत्री स्वर्गीय नेते आर.आर.आबा आणि मंत्री अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणात लक्ष या भागासाठी दिलं. नेवळी फाटा ते बदलापूरचा टर्न या भागात एकही खड्डा नाही. त्यावेळी, कथोरेंना प्रचंड पैसा या दोन्ही नेत्यांनी दिला. या असल्या लोकांनी आमचा पक्ष का सोडला हेच आम्हाला समजत नाही, असे म्हणत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीत सोडून गेलेल्या स्थानिक नेत्यावर टीका केली. तसेच, पक्षात यायचं असेल तर.. असे म्हणत इशाराही दिला.
आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाणे आणि नवी मुंबईतील जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम आणि उद्घाटन सोहळ्यांना हजेरी लावली. यावेळी, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हेही त्यांच्यासमवेत उपस्थित होते. अंबरनाथ-बदलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात आव्हाड बोलत होते.
पुढे बोलताना आव्हाड म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील कथोरेंविरुद्धची लढाई ही प्रामाणिक विरुद्ध गद्दार अशीच असली पाहिजे. कारण, त्यांचा अपमान होईल, असे ना शरद पवार वागले, ना आर.आर.पाटील वागले ना अजित पवार. ते काम करणारे आमदार होते, यात शंका नाही. पण, कामासाठी सहकार्य करणारा राष्ट्रवादी पक्ष तुमच्या पाठिशी उभा होता हे तुम्ही कसे विसरलात? असा प्रश्न आव्हाड यांनी विचारला. कार्यकर्त्यांच्या मनात ही सल असते. केवळ एका तिकीटासाठी तुम्ही भाजपात गेला. त्यामुळेच, आशिष दामलेंसारख्या युवकांनी स्थानिक निवडणुका गंभीरतेनं घ्यायला हव्यात, कारण ह्या परिणामकारक असतात.
भाजपात कोण गेले ते परत येतील, मग त्यांना महत्त्वाचं स्थान मिळेल, असा विचार आपण करु नका. त्यांना ते स्थान अजिबात देणार नाही. माझं तर स्पष्ट मत आहे, ते मी पवारसाहेब आणि सुप्रिया सुळेंपाशी बोलून दाखवलंय. येणाऱ्यांनी यावं, आम्ही सर्वांचं स्वागत करु, तुम्ही आमच्याच घरातले आहात. पण, पुढच्या बाकावर बसायला मिळेल, हा विचार करुन येऊ नका. थोडंस दोन वर्षे तुम्हाला वेटींग करावं लागेल, असे आव्हाड यांनी राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांना इशारा देत सांगितलंय.
भाजप सरकार आरक्षण काढणार
पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजपाने 2012 पासून 2014 पर्यंत पेट्रोल दरवाढीवरुन कायम टीका केली, त्यावेळी स्मृती इराणी सर्वात पुढे होत्या, असे म्हणत हम करे सो कायदा या विचाराने हे सरकार चालू असल्याचं सांगितलं. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही आंदोलनजीवी शब्दावरुन आव्हाड यांनी टीका केली. गुरुदासपूरच्या निवडणुकीचा वृत्तांत सांगताना भाजपाचा तेथील पराभव हे वेगळेच संकेत असल्याचेही आव्हाड यांनी म्हटलं. आपल्यावर श्रेष्ठ नाटककार नरेंद्र मोदी हे भुलभुलैया करण्याचं काम करतात, मोदी सरकारने देशाच्या मालकीच्या कंपन्या विकण्याचा धडाकाचा लावलाय, येणाऱ्या काळात भाजप सरकार आरक्षण काढेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हळूच बाजूला सारेल, असं माझं स्पष्ट मत आहे, असेही आव्हाड यांनी म्हटलं. ज्या संविधानामध्ये आपल्याला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलाय, त्याचं संविधानातील अधिकार काढण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत. आंदोलनजीवी को रोखना होगा, याचा अर्थ काय? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.
पेट्रोल दरवाढीवरुन टीका
अंबरनाथ बदलापूरमधील पाण्याचा प्रश्न किती उग्र आहे, येथील महिलांना त्याची पूर्ण कल्पना आहे. आपले ठाण्याचे खासदार कधी आले इकडे, कुणी सांगेल का? असा प्रश्न विचारत आव्हाड यांनी ठाण्यातील शिवसेना नेत्यांवर नाव न घेता टीका केली. तसेच, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन केंद्र सरकारवरही टीका केली, पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरुन एकेकाळी ज्येष्ठ कलावंतापासून ते अनेकांनी काँग्रेस व डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली होती. पण, आज सगळे चडीचूप आहेत. भाजपा सरकारमध्ये एकाधिकारशाही असल्याचे सांगत हे सरकार आरक्षणविरोधी असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.