‘स्ट्रीट आर्ट’ला लाभले तरूण कलावंतांचे पंख
By admin | Published: March 16, 2017 02:56 AM2017-03-16T02:56:57+5:302017-03-16T02:56:57+5:30
रस्त्यावरुन जाताना कधीकाळी नजरेस पडणाऱ्या, आता काळाच्या ओघात लुप्त होत चाललल्या ‘स्ट्रीट आर्ट’ला नवसंजीवनी देण्यासाठी ठाण्यातील तरूण पुढे आले आहेत.
ठाणे : रस्त्यावरुन जाताना कधीकाळी नजरेस पडणाऱ्या, आता काळाच्या ओघात लुप्त होत चाललल्या ‘स्ट्रीट आर्ट’ला नवसंजीवनी देण्यासाठी ठाण्यातील तरूण पुढे आले आहेत. ही कला पुनरूज्जीवित करण्याचे काम कळवा येथील कवीज क्रिएटीव्ह आर्टने सुरू केले असून कळवावासीयांना तिची झलक पाहायला मिळाली. निमित्त होते, शिवजयंतीचे. त्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य चित्र रेखाटण्यात आले. सूरज परदेशी यांच्या पुढाकाराने रेखाटलेली ही कलाकृती पाहण्यासाठी नागरिकांची, कलारसिकांची एकच गर्दी झाली होती.
एखाद्या उद्यानाच्या बाहेर, पदपथाच्या कडेला किंवा मध्यभागी खडू हातात घेऊन रस्त्यावर चित्र रेखाटताना पूर्वी कलाकार सहज नजरेस पडत असे. देवदेवतांचे चित्र, राष्ट्रपुरूष किंवा एखादे आगळेवेगळे आकर्षक चित्र हे कलाकार रेखाटत बसलेले पाहायला मिळत. काळ बदलला, तसतशी ही कला हरवत गेली.
ही कला पुन्हा लोकांसमोर यावी या उद्देशाने दोन वर्षांपूर्वी ‘कवीज क्रिएटिव्ह आर्ट’ने दीड हजार चौरस फुटांची ही स्ट्रीट आर्ट साकारली होती. यात ‘कौटुंबिक हिंसाचार’ हा विषय हाताळला होता. एखादे औचित्य साधत ती कला आम्ही लोकांसमोर आणतो, असे परदेशी सांगतात. शिवजयंतीनिमित्त २५० चौरस फुटांचे शिवाजी महाराजांचे चित्र या तरूण कलाकारांनी रेखाटले. याआधी काढलेल्या ‘स्ट्रीट आर्ट’ मध्ये त्यांनी केवळ खडू, कोळसा आणि गेरुचा वापर केला होता. यावेळेस १०० रंगीबेरंगी खडू, कोळसा, गेरु यांच्या साहय्याने महाराजांचे चित्र रेखाटले. सकाळी साडेसात वाजल्यापासून सूरज यांच्यासह ज्योती परदेशी, मयुरेश तायडे, प्रांजल गावडे, दीपा शेषाद्री, मेघना जाधव या कलाकारांनी आपल्या कलेतून अवघ्या दीड तासांत हे चित्र साकारले. (प्रतिनिधी)