गरब्यामध्ये तरुणाईचा सळसळता उत्साह, दिवसा अभ्यास, रात्री फेर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 12:46 AM2019-10-05T00:46:18+5:302019-10-05T00:48:23+5:30
आचारसंहितेमुळे नवरात्रोत्सवात राजकीय बॅनरबाजी गायब असली, तरी तरुणाईमधील उत्साह तसुभरही कमी झालेला नाही. शहरात विविध मंडळांच्या गरबा, दांडियांंचे तरुणाईमध्ये आकर्षण आहे.
- जान्हवी मोर्ये
डोंबिवली : आचारसंहितेमुळे नवरात्रोत्सवात राजकीय बॅनरबाजी गायब असली, तरी तरुणाईमधील उत्साह तसुभरही कमी झालेला नाही. शहरात विविध मंडळांच्या गरबा, दांडियांंचे तरुणाईमध्ये आकर्षण आहे. पहिल्या सत्राच्या परीक्षांचा काळ असला, तरी विद्यार्थी दिवसभर अभ्यास करून गरब्यासाठी खास वेळ काढत आहेत. गरब्याला बॉलिवूड-टीव्ही मालिकांचे कलाकार, गायक हजेरी लावत असून त्यांना पाहण्यासाठीही गर्दी होत आहे. ही गर्दी नियंत्रित करताना आयोजकांची दमछाक होत असून शनिवारी, रविवारी सुटी असल्यामुळे गर्दी नियंत्रित करण्यासाठी आयोजक खास नियोजन करण्यात गुंतल्याचे दिसत आहेत.
गरबा खेळण्यासाठी तरुण-तरुणी खास पेहराव करून येत आहेत. शाळा-कॉलेजच्या परीक्षा सुरू असल्या तरी त्यांचा उत्साहावर काहीच परिणाम झालेला नाही. दिवसा अभ्यास आणि रात्री गरबा असे अभ्यासाचे वेळापत्रकच बनवले असल्याचे तरुण-तरुणी सांगत आहेत. अदिती ठक्कर म्हणाली की, आमची परीक्षा सुरू आहे. दिवसभर अभ्यास करतो आणि रात्री गरब्यासाठी वेळ काढतो. त्यामुळे अभ्यासही होतो आणि गरब्याचा आनंदही लुटता येतो. अभ्यास केल्यामुळे पालकही दांडिया खेळण्यापासून रोखत नाही. त्यामुळे परीक्षा आणि पाऊस या दोन्हींचा गरबाप्रेमींवर काहीच परिणाम झाला नाही.
बड्या मंडळांच्या गरब्याला जास्त गर्दी होत असल्याने छोट्या मंडळांकडील ओघ कमी झाला असल्याचे काही मंडळांचे म्हणणे आहे. मोठ्या मंडळांतर्फे आयोजित दांडियाला गर्दी होत असल्याने अनेकांना प्रवेश नाकारला जात असल्याने आल्यापावली परत फिरावे लागत आहे. त्यामुळे काही गरबाप्रेमी पैसे घ्या पण प्रवेश द्या, असे सांगत आहेत. डोंबिवलीत बड्या गरब्यासाठी बाहेरूनही तरुण-तरुणी येत असून त्यांना रेल्वेस्थानकात इच्छितस्थळी जाण्यासाठी रिक्षा मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तसेच, गरब्याच्या परिसरात वाहतूककोंडीही होत आहे. स्वयंसेवकांनी काही दांडियाप्रेमींना आत सोडत गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. भगवती भानुशाली यांना एका ठिकाणाहून प्रवेश न मिळाल्याने परतावे लागले.
काही ठिकाणी नवरात्रोत्सवानिमित्त पाककला, रांगोळी, मेहंदी अशा विविध स्पर्धा घेतल्या जात आहेत. तसेच गरब्यामध्ये महिला आणि मुलींनाच प्रवेश दिला जातो. येथे ओळखीतल्या पुरुषांनाच प्रवेश दिला जातो. १० वाजेपर्यंतच गरब्याला परवानगी असली, तरी वेळेचे बंधन पाळूनही गरबाप्रेमी आनंद लुटताना दिसत आहेत. डोंबिवलीतील एका मंडळाने यंदा गरबा न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. गरब्यावर होणाऱ्या खर्चाच्या पैशांतून पूरग्रस्त भागातील आदिवासीपाड्यांवरील दोन शाळांना मदत केली जाणार असल्याचे या मंडळाच्या गौरांग पाटणकर यांनी सांगितले.
दांडिया गायब, गरब्याचीच धूम
नवरात्रोत्सव म्हटले की, सर्वप्रथम दांडिया आठवतो. पण, यंदा सर्वत्र गरब्याचीच धूम अधिक आहे. त्यामुळे गाण्यांच्या ठेक्यावर तरुणाई गरबा खेळताना दिसत आहे.