टोइंंग व्हॅनवरील कर्मचाऱ्याची तरुणाला धक्काबुक्की; पोलीस उपायुक्तांनी दिले चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 12:43 AM2020-12-05T00:43:07+5:302020-12-05T00:43:13+5:30
टोइंंग व्हॅनवरील एका कर्मचाऱ्याने त्यांच्यासोबत झटापट केली. यात त्यांच्या हाताला मार लागला. एखाद्या वाहनावर कारवाई करण्यापूर्वी व्हॅनमधील वाहतूक पोलिसाने उद्घोषणा करणे अपेक्षित असते
ठाणे : ठाणे शहर पोलिसांच्या कंत्राटी टोइंंग व्हॅनवरील एका कर्मचाऱ्याने नो-पार्किंगमधील महेंद्र माने या दुचाकीचालकाशी हुज्जत घालून त्याला धक्काबुक्की केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उथळसर भागात घडली. याप्रकरणी राबोडी वाहतूक शाखेच्या निरीक्षकांना पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील रहिवासी माने हे अन्नपदार्थ घरपोच करणाऱ्या एका कंपनीत नोकरीला आहेत. शुक्रवारी दुपारी त्यांनी उथळसर येथील एका उपाहारगृहासमोर त्यांची दुचाकी उभी केली. त्यानंतर, ते उपाहारगृहात अन्नपदार्थ घेण्यासाठी गेले. त्याचदरम्यान, वाहतूक नियंत्रण शाखेची टोइंंग व्हॅन त्याठिकाणी आली. नो-पार्किंगमध्ये असलेली माने यांची दुचाकी टोइंंग व्हॅनवरील कर्मचारी उचलून व्हॅनवर ठेवत असतानाच तिथे ते पोहोचले. त्यांनी या कारवाईला विरोध करीत त्यांची दुचाकी खाली खेचण्याचा प्रयत्न केला.
मात्र, टोइंंग व्हॅनवरील एका कर्मचाऱ्याने त्यांच्यासोबत झटापट केली. यात त्यांच्या हाताला मार लागला. एखाद्या वाहनावर कारवाई करण्यापूर्वी व्हॅनमधील वाहतूक पोलिसाने उद्घोषणा करणे अपेक्षित असते. मात्र, या वाहतूक पोलिसांकडून अशी कोणतीही उद्घोषणा झाली नसल्याचा आरोपही माने यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी दोघांचीही एकमेकांविरुद्ध तक्रार असल्यामुळे माने यांनी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही. याबाबतची चौकशी करण्याचे आदेश राबोडी वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत. दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.- बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर
दुचाकी उचलताना उद्घोषणाही पोलीस कर्मचाऱ्याने केली नव्हती. दुचाकी टोइंंगच्या व्हॅनवर ठेवली जात असतानाच कारवाईला विरोध केला. मात्र, व्हॅनवरील कर्मचाऱ्याने न जुमानता गाडी खेचण्याचा प्रयत्न केल्याने झटापटीत हाताला मार लागला. - महेंद्र माने, जखमी तरुण