पती-पत्नीच्या भांडणात तरुणाने गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 01:23 AM2020-01-09T01:23:37+5:302020-01-09T01:23:42+5:30
पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणे एका तरु णाच्या जीवावर बेतल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री अजंठा कम्पाउंड परिसरात घडली.
भिवंडी : पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणे एका तरु णाच्या जीवावर बेतल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री अजंठा कम्पाउंड परिसरात घडली. पतीने साथीदाराच्या मदतीने या तरु णाची धारदार चॉपरने वार करून हत्या केली. नदीम मोमीन (३५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून इम्रान रसूल सय्यद याला अटक केली आहे.
आरोपी इम्रान आणि त्याच्या पत्नीमध्ये सहा महिन्यांपासून घटस्फोटावरून वाद सुरू आहे. त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी नदीम हा इम्रानच्या घरी गेला होता. तेव्हा दोघांच्यात वाद होऊन आमच्या भांडणात न पडण्याची धमकी इम्रानने नदीमला दिली. त्यावरून दोघांमध्ये हाणामारीही झाली. त्याचा राग धरून इम्रानने साथीदाराच्या मदतीने नदीमवर मध्यरात्री अजंठा कम्पाउंड परिसरात चॉपरने हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यांत पडलेल्या नदीमला सोडून आरोपी परतत असताना जमावाने इम्रानला पकडून चोप दिला. मात्र, त्याचा साथीदार पळून गेला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवला. मारहाणीत जखमी झालेल्या इम्रानला ताब्यात घेऊन ठाण्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
>व्हिडीओ कॉल करून पत्नीला दिली माहिती
आरोपी इम्रानने नदीमची हत्या करण्यापूर्वीचा आपला व्हिडीओ पत्नीला पाठवला होता. तसेच त्यानंतर व्हॉट्सअॅपवरून व्हिडीओ कॉल करून नदीमची हत्या करणार असल्याचे कळवले असल्याची माहिती आरोपीच्या पत्नीने पोलिसांना दिली.