हृदयद्रावक! धुळवडीत नाचून घरी गेलेल्या तरुणाचा मृत्यू; वर्षभरापूर्वीच अडकला होता लग्नाच्या बेडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 12:55 PM2022-03-20T12:55:05+5:302022-03-20T12:55:20+5:30
छातीत दुखू लागल्यानं रुग्णालयात नेलं; उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
बदलापूर : सोसायटीत धुळवड खेळताना गाण्यांच्या तालावर नाचल्यानंतर घरी गेलेल्या आशुतोष संसारे (२८) याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
पश्चिमेच्या हेंद्रेपाडा परिसरातील शुभदन सोसायटीत आशुतोष राहत होता. या सोसायटीत होळी आणि धुलीवंदनानिमित्त शुक्रवारी दुपारी स्पीकरवर गाणी लावली होती. तेथे सर्व रहिवासी नाचत होते. त्यात आशुतोषही होता. नाचून झाल्यावर तो घरी गेला. त्याचवेळी त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याच्या पत्नीने शेजाऱ्यांना याची माहिती देताच त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी सांगितले.
वर्षापूर्वीच झाले लग्न
आशुतोषचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते. त्यामुळे त्याच्या मृत्यूने त्याच्या पत्नीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. आशुतोषचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.