ठाण्यात क्षुल्लक कारणावरुन राबोडीतील तरुणावर गोळीबार ; एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 01:12 AM2021-05-26T01:12:16+5:302021-05-26T01:14:58+5:30
काही किरकोळ कारणावरुन मनात राग धरून दोघांनी मोहमद जैद मंजूर खान ( ३०) यांच्यावर चाकूने हल्ला करीत पिस्तूलातून गोळीबार केल्याची घटना राबोडीत मंगळवारी घडली. या घटनेमध्ये खान गंभीर जखमी झाले असून गोळी चुकल्याने ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: काही किरकोळ कारणावरुन मनात राग धरून दोघांनी मोहमद जैद मंजूर खान ( ३०) यांच्यावर चाकूने हल्ला करीत पिस्तूलातून गोळीबार केल्याची घटना राबोडीत मंगळवारी घडली. या घटनेमध्ये खान गंभीर जखमी झाले असून गोळी चुकल्याने ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. याप्रकरणी शबीर अब्दुल गौस (३०) याला राबोडी पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न व हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. खान हे नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करतात. ते त्यांचा मित्र इम्रान खान उर्फ बंटी यांच्यासोबत वास्तव्याला आहेत. त्याचाच राग शबीर याच्या मनात होता. शबीर हा खान यांना त्यांच्यासोबत राहण्यास सांगत असे. दरम्यान, मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खान राबोडीतील रफ्तार हाऊसजवळील तपासेनगर याठिकाणी आपल्या मित्रांसोबत बसलेले होते. त्याचवेळी शबीर त्याच्या एका साथीदारासह मोटर सायकलवरु न तिथे आला. शबीरने त्याला मोटारसायकलवर बसण्याचा आग्रह धरला. मात्र, खान यांनी त्याच्या मोटारसायकलवर बसण्यास नकार दिला. याचाच राग आल्याने शबीर आणि त्याच्या साथीदाराने खान यांना मारहाण केली. त्यानंतर शबीरच्या साथीदाराने चाकूने खान यांच्या हातावर वार केले. त्यावेळी शबीर शेख याने तुम बहोत भाई बनते हो,अभी मै तुझे जिंदा नही छोडुंगा असे म्हणून पिस्तुलच्या मागील बाजूने खान यांच्या डोक्यावर प्रहार केला. त्यानंतर पिस्तूल मधून एक राऊंड खान यांच्या दिशेने गोळीबारही केला. मात्र, गोळी चुकल्याने खान या घटनेतून थोडक्यात बचावले. शबीर आणि त्याचा साथीदार मोटरसायकलवरु न पळून गेले. मात्र, या हल्ल्यात खान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात उपचार करण्यात आले.