नाल्यात वाहून गेलेला तरुण बेपत्ता, शोध पथकाचे कार्य सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 04:21 AM2018-07-12T04:21:00+5:302018-07-12T04:21:08+5:30
पूर्वेतील नांदिवली नाल्यात मंगळवारी रात्री बुडालेल्या हर्षद जिमकल (२४) याचा शोध बुधवारीही लागू शकलेला नाही. केडीएमसीचे अग्निशमन दलाचे पथक, ठाणे महापालिकेचे आपत्ती प्रतिसाद पथक यांनी नाला, त्याच्याशेजारील दलदल तसेच झाडीझुडपात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केले.
डोंबिवली - पूर्वेतील नांदिवली नाल्यात मंगळवारी रात्री बुडालेल्या हर्षद जिमकल (२४) याचा शोध बुधवारीही लागू शकलेला नाही. केडीएमसीचे अग्निशमन दलाचे पथक, ठाणे महापालिकेचे आपत्ती प्रतिसाद पथक यांनी नाला, त्याच्याशेजारील दलदल तसेच झाडीझुडपात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केले. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांना यश आले नाही. दरम्यान, हर्षदला वाचवण्यासाठी गेलेलाही बुडाल्याच्या वृत्ताचा यंत्रणांनी इन्कार केला आहे.
पूर्वेतील गांधीनगर परिसरातील मुक्ताई इमारतीत राहणारा हर्षद आयटीआयमध्ये शिक्षण घेत आहे. मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास क्लासवरून तो घरी परतत होता. या वेळी नांदिवली नाल्याजवळ तो लघुशंकेसाठी उभा राहिला असता, त्याचा तोल गेला. त्यामुळे तो नाल्यात पडला आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागला. या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी मानपाडा पोलीस आणि अग्निशमन दलास कळवली. मात्र, पाण्याचा जोरदार प्रवाह, रात्रीचा अंधार आणि पाऊस, यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी नाल्यात उतरून दोरीद्वारे रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला.
ठाणे महापालिकेने आपत्ती प्रतिसाद पथक बुधवारी दुपारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलासह त्यांनी हर्षदचा शोध घेण्यास सुरुवात केली. आयरे गाव परिसरात हा नाला खाडीला मिळतो. तिथपर्यंत ही पथके गेली. तसेच दलदल आणि झाडीझुडपातही हर्षदचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पथकांना यश आले नाही.
ठाणे व आसपासच्या परिसरातील वाहून गेलेल्या मुलांना शोधण्यात पटाईत असलेल्या खडवली येथील शेतकऱ्यांच्या १० मुलांना कल्याण तहसीलदारांनी पाचारण केले होते.
रबरबोट, स्पीडबोट
शोधपथकात अद्ययावत तीन रबर बोटी, रस्सी, टायर ट्युबचा वापर करत आहे. आयरे गावानजीक दाखल झालेले ठाण्याचे पथक, पोलिसांनी खाडीकिनारी हर्षदचा शोध घेतला.
नाल्यावर उभारलेल्या इमारती, चाळी आणि बंगल्यांना नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. तसेच, त्या तोडण्यात येणार असून संबंधितांवर एमआरटीपीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
- गोविंद बोडके, आयुक्त, केडीएमसी