मैत्रीच्या नावाखाली तरुणीवर बलात्कार; पाेलिस हवालदाराला अटक
By जितेंद्र कालेकर | Published: February 29, 2024 08:56 PM2024-02-29T20:56:23+5:302024-02-29T20:56:54+5:30
ठाणेनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा: बाहेर फिरण्याच्या बहाण्याने केले अत्याचार
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : वाचनालयात झालेल्या मैत्रीच्या बहाण्याने वेगवेगळया ठिकाणी फिरण्यास नेत कळव्यातील एका २० वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी पिडितेने तक्रार दाखल केल्यानंतर २८ वर्षीय अजय मोरे या माेटर परिवहन विभागातील चालक पाेलिसाला अटक केल्याची माहिती ठाणेनगर पाेलिसांनी गुरुवारी दिली. याप्रकरणी सखाेल चाैकशी करण्यात येत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
अजय मोरे हा खारेगावात वास्तव्याला असून मुळचा ताे जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी आहे. ताे कळव्यातील जवाहरबाग वाचनालयात अभ्यासाकरिता जात होता. त्याच ठिकाणी या २० वर्षीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीशी त्याची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर बाहेर फिरण्याच्या बहाण्याने अजयने तिला १० डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत जांभळी नाका येथील एका लाॅजवर तसेच खारेगाव कळवा या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार तिने ठाणेनगर पोलिस ठाण्यात २७ फेब्रुवारी २०२४ राेजी दाखल केली. तिच्या तक्रारीवरून ठाणे नगर पोलिसांनी याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करून २८ फेब्रुवारी रोजी त्याला अटक केली. ठाणे नगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
खात्यांतर्गतही हाेणार चाैकशी-
ठाणे शहर पाेलिसांच्या माेटर परिवहन विभागागात (एमटी)माेरे अमलदार पदावर कार्यरत आहे. ताे १८ फेब्रुवारी २०२४ पासून डयूटीवर गैरहजर असल्याची माहिती एमटीच्याच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्याची या प्रकरणातही आता खात्यांतर्गत चाैकशी केली जाणार आहे.