ठाण्यात ३१ व्या मजल्यावरुन उडी घेत तरुणीची आत्महत्या; कुटुंबीयांपासून दुरावल्याने मानसिक घुसमट 

By जितेंद्र कालेकर | Published: December 25, 2023 06:56 PM2023-12-25T18:56:36+5:302023-12-25T18:57:08+5:30

लक्ष्मी यांचा भाऊ संतोष उपाध्याय याने तिला त्यांच्याकडे पाठविले होते.

Young woman commits suicide by jumping from 31st floor in Thane Mental disturbance due to separation from family | ठाण्यात ३१ व्या मजल्यावरुन उडी घेत तरुणीची आत्महत्या; कुटुंबीयांपासून दुरावल्याने मानसिक घुसमट 

ठाण्यात ३१ व्या मजल्यावरुन उडी घेत तरुणीची आत्महत्या; कुटुंबीयांपासून दुरावल्याने मानसिक घुसमट 

ठाणे: नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने उत्तरप्रदेशातून ठाण्यात सहा महिन्यांपूर्वी आलेल्या वर्षां योगेश उपाध्याय (१९, रा. ओलीविया व्हेरेथॉन, मानपाडा, ठाणे) या तरुणीने ३१ व्या मजल्यावरुन स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षा ही मानपाडा ओलीविया व्हेरेथॉन या इमारतीच्या सी विंगमधील ३१ व्या मजल्यावरील रहिवाशी देवेश दुबे यांच्याकडे जुलै २०२३ पासून वास्तव्याला होती. ती देवेश यांच्या पत्नी लक्ष्मी हिच्या माहेरच्या खोजातपूर (उत्तरप्रदेश) या गावावरुन त्यांच्याकडे शिक्षण आणि कामासाठी आली होती. 

लक्ष्मी यांचा भाऊ संतोष उपाध्याय याने तिला त्यांच्याकडे पाठविले होते. तिचे दुबे यांच्या घरात मन रमत नसल्याने तिच्या आईलाही फोनवरुन तसे सांगितले होते. त्यामुळेच आपल्या घरी जाण्यासाठीही ती आईला फोन करुन सांगत होती. परंतू, चांगल्या भवितव्यसासाठी तू तिथेच रहा, असा सल्ला आईने तिला दिला होता. ती मुळची गावची असल्याने तिचे ठाण्यात मन रमत नव्हते. यासाठीच तिने पुन्हा २४ डिसेंबर रोजी तिची आई अंजू व मामा सुमित यांना फोन करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी तो फोन घेतलाच नाही. तिची मानसिक स्थिती चांगली नसल्याने ती २५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता उठली. सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास ती घरातील हॉलमध्ये आली.

त्यानंतर गॅलरीत दोन तीन फेऱ्या मारुन काचेचा दरवाजा उघडून बाहेरील छोटया कठडयावर बसली. त्यानंतर तिने खाली उडी मारल्याचे चित्रण सीसीटीव्ही फूटेजमध्ये मिळाल्याचे चितळसर पोलिसांनी सांगितले. दुबे कुटूंबीय २० डिसेंबर रोजी गोव्याला गेले. ते २४ डिसेंबर रोजी परतले. वर्षाच्या मनात गावी जाण्याची घुटमळ सुरु होती. यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल शिरोळे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
 

Web Title: Young woman commits suicide by jumping from 31st floor in Thane Mental disturbance due to separation from family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.