मोबाईल हिसकावतांना तरुणीचा मृत्यु: आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 11:47 PM2021-06-11T23:47:53+5:302021-06-12T00:03:58+5:30
नाशिक - मुंबई पूर्व द्रूतगती महामार्गावरुन मैत्रिणीसह रिक्षाने जाणाऱ्या कन्मीला रायसींग (२७, रा. कलीना, मुंबई) या तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकावतांना तोल जाऊन तिचा मृत्यु झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी अल्केश अन्सारी (२०) आणि सोहेल रमजान अन्सारी (१८, रा. दोघेही भिवंडी) या सराईत चोरटयांना अवघ्या २४ तासातच नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: नाशिक - मुंबई पूर्व द्रूतगती महामार्गावरुन मैत्रिणीसह रिक्षाने जाणाऱ्या कन्मीला रायसींग (२७, रा. कलीना, मुंबई) या तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकावतांना तोल जाऊन तिचा मृत्यु झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी अल्केश अन्सारी (२०) आणि सोहेल रमजान अन्सारी (१८, रा. दोघेही भिवंडी) या सराईत चोरटयांना अवघ्या २४ तासातच नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली. या तपास पथकाला २५ हजारांचे बक्षीस अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी शुक्रवारी घोषित केले आहे.
ठाण्यातील विवियाना मॉलमधील एका स्पाध्ये ब्युटीशियनचे काम करणाºया किन्मला आणि लालगुरसांगी फॅन्चुन (३०, रा. कलीना, मुंबई) या मुळच्या मणिपूर मिजोराम येथील रहिवाशी असलेल्या तरुणी मुंबईतील कालीना येथे वास्तव्याला होत्या. नेहमीप्रमाणे आपले स्पामधील काम आटोपून ९ जून २०२१ रोजी रात्री ७.५० वाजण्याच्या सुमारास मॉल समोरील रिक्षाने सांताक्रूझला जाण्यासाठी बसल्या. त्या ठाण्यातील तीन हात नाका येथून रिक्षाने मार्गक्रमण करीत असतांना एका मोटारसायकलवरुन आलेल्या अल्केश आणि सोहेल या दोघांनी किन्मला हिच्या हातातील मोबाईल जबरीने हिसकावला. अचानक घडलेल्या या घटनेने भांबावलेली किन्मला तोल जाऊन रिक्षातून खाली कोसळली. यात तिच्या डोक्याला जबर मार लागला. स्थानिकांच्या मदतीने तिला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, पोलीस निरीक्षक रविंद्र क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, दिनेश चव्हाण, सचिन बाराते आदी १७ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकांची निर्मिती करण्यात आली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरलेल्या मोबाईलच्या आधारेच या पथकांनी या दोघांनाही भिवंडीतून अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील मोबाईलसह एक मोटारसायकल तसेच अन्य चोरीमधील चार मोबाईल असा एक लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांना १६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
............................
दोघांवरही चोरीचे गुन्हे दाखल-
दोघांचेही शिक्षण आठवीपर्यंत झाले असून ते बेरोजगार आहेत. त्यांचे आई वडिल मोलमजूरी करतात. अल्केश याच्याविरुद्ध कोनगावमध्ये तर सोहेल याच्याविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी याआधीही अशाच प्रकारचे १० ते १२ गुन्हे केल्याची बाबही चौकशीत समोर आली आहे. दोघांनाही गांजा आणि दारुचे व्यसन आहे.
................................
तपास पथकाला शाबासकी-
नौपाडा पोलिसांनी २४ तासांमध्ये आरोपींना जेरबंद केल्याबद्दल अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. अशा गुन्हयांवर प्रतिबंध करण्यासाठी शहरांतर्गत आणि महामार्गावर पोलिसांची गस्त वाढविण्यात आल्याचे उपायुक्त अंबुरे यांनी सांगितले.