दारुसाठी पैसे न दिल्याने धाकटयाने केला मोठा भावाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 08:40 PM2021-02-14T20:40:53+5:302021-02-14T20:44:15+5:30
दारुसाठी पैसे न दिल्याने रुपेश संपत मोरे (२३, रा. अंबिकानगर, वागळे इस्टेट, ठाणे ) या मोठया भावाचा घरातील दगडी पाटयाने खून करणाऱ्या गणेश उर्फ गौरव संपत मोरे (२२) या धाकटया भावाला वागळे इस्टेट पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: दारुसाठी पैसे न दिल्याने रुपेश संपत मोरे (२३, रा. अंबिकानगर, वागळे इस्टेट, ठाणे ) या मोठया भावाचा घरातील दगडी पाटयाने खून करणाऱ्या गणेश उर्फ गौरव संपत मोरे (२२) या धाकटया भावाला वागळे इस्टेट पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
वागळे इस्टेट परिसरातील भीमगर्जना चाळ अंबिकानगर, येथे रुपेश (२३), गणेश (२२) आणि यश (१८) हे तिघे भाऊ एकाच घरात वास्तव्याला आहेत. गणेश हा बेरोजगार असून त्याला दारुचे मोठया प्रमाणात व्यसन आहे. त्याच्यावर एका नशामुक्ती केंद्रातही उपचार करण्यात आले होते. जुलै २०२० मध्ये या केंद्रातून तो घरी परतला होता. तरीही तो मोठा भाऊ रुपेशकडे वारंवार नशेसाठी पैशांची मागणी करीत होता. १३ फेब्रुवारी २०२१ रोजीही त्याने पुन्हा रुपेशकडे पैशांची मागणी केली. मात्र, रुपेशने ते देण्यास नकार दिला. याच रागाच्या भरात गणेशने त्यांच्या घरातील मसाला वाटण्यासाठी असलेला दगडी पाटा उचलून रुपेशच्या डोक्यात घातला. यात रक्ताच्या थारोळयात पडलेल्या रुपेशला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनास्थळावरुन पसार झालेल्या गणेशला वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले, निरीक्षक व्ही. डी. मुतडक यांच्या पथकाने रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास अटक केली.