ठाण्यातील आपला दवाखाना व्हेंटिलेटरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:27 AM2021-06-24T04:27:07+5:302021-06-24T04:27:07+5:30
ठाणे : ठाण्यातील गोरगरीब नागरिकांना मोफत आरोग्यसेवा मिळावी यासाठी सत्ताधारी पक्षाने सुरू केलेला आपला दवाखाना प्रकल्प वादात सापडला आहे. ...
ठाणे : ठाण्यातील गोरगरीब नागरिकांना मोफत आरोग्यसेवा मिळावी यासाठी सत्ताधारी पक्षाने सुरू केलेला आपला दवाखाना प्रकल्प वादात सापडला आहे. दिल्लीच्या मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर आधारित ठाणे महापालिकेने दोन वर्षांपूर्वी आपला दवाखाना ही संकल्पना राबविली. पन्नास दवाखाने सुरू करण्याचे काम ठेकेदाराला दिले असून, गेल्या दोन वर्षांपासून १५ दवाखानेसुद्धा उघडले नसल्याची माहिती मनसेच्या जनहित व विधि विभागाचे शहराध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी उघडकीस आणली आहे.
ठाणे शहराची २६ लाख लोकांची लोकसंख्या असून, केवळ तीस आरोग्य केंद्र व दोन सरकारी रुग्णालये सोडली, तर प्रशासनाकडून आरोग्य सेवा पुरविणारी अन्य यंत्रणा नाही. कोरोना काळात ठाणे शहरात ५० आपला दवाखाना सुरू झाले असते, तर अनेकांना याचा आधार मिळाला असता; पण प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे दोन वर्षांत आपला दवाखाना पूर्णपणे सुरू झालेच नाहीत. विविध झोपडपट्टी असलेल्या परिसरात आपला दवाखाना कार्यरत होणार होते; पण गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकीय घोटाळ्यात अडकलेला हा प्रकल्प कधीच सुरळीत सुरू झाला नाही. ठाण्यामध्ये आपला दवाखाना हे लोकांच्या सेवेसाठी उघडण्यात आले आहेत की राजकीय जाहिरातबाजीसाठी, हे स्पष्ट होत नाही. काही राजकीय मंडळी त्याचा उपयोग आपल्या वैयक्तिक प्रसिद्धीसाठी करीत असल्याचा आरोपही महिंद्रकर यांनी केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत रुग्णांना मोफत औषधोपचार, तसेच ईसीजी, युरीन टेस्ट, तसेच ब्लड शुगर टेस्टिंग हे मोफत करून दिले जाणार होते. यासाठी महानगरपालिका प्रति रुग्ण दीडशे रुपये ठेकेदाराला देणार होती. दररोज १०० रुग्णांची चाचणी औषधोपचार ठेकेदाराकडून करणे अपेक्षित होते. प्रायोगिक तत्त्वावर दोन दवाखाने सुरू केले, पण काही महिन्यांतच ही संकल्पना फसल्याचे पुढे आले. मात्र, तरीही ठाणे महापालिकेने रेटून आणखी ५० दवाखाने उभारण्याचा घाट घातला. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या दवाखान्याचा कब्जा खासगी प्रयोगशाळेने घेतला आहे. येथे लोकांकडून पैसे घेऊन कोरोनाची चाचणी केली जात असून, या प्रयोगशाळेतील लोकांकडून राजकीय जाहिरातबाजीदेखील सुरू असल्याचा आरोप महिंद्रकर यांनी केला.