बिग सिनेमातील कर्मचाऱ्यांसाठी युवा सेना सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:38 AM2021-03-06T04:38:17+5:302021-03-06T04:38:17+5:30
अंबरनाथ : बिग सिनेमाच्या २८ कर्मचाऱ्यांची नोकरी युवा सेनेमुळे वाचली आहे. अंबरनाथच्या बिग सिनेमामध्ये काम करणाऱ्या या मुलांना १० ...
अंबरनाथ : बिग सिनेमाच्या २८ कर्मचाऱ्यांची नोकरी युवा सेनेमुळे वाचली आहे. अंबरनाथच्या बिग सिनेमामध्ये काम करणाऱ्या या मुलांना १० दिवसांपूर्वी अचानक नोकरी सोडण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करत या कर्मचाऱ्यांची नोकरी वाचवली आहे.
कोरोनामुळे मागील वर्षभरापासून सिनेमागृह बंद असून सिनेमागृह चालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. आता ५० टक्के क्षमतेने सिनेमागृह सुरू करायला परवानगी मिळाली असली तरी एकही नवीन चित्रपट आलेला नसून चित्रपट आला तरी प्रेक्षक भीतीपोटी सिनेमागृहात यायला तयार नाहीत. त्यामुळे अंबरनाथच्या बिग सिनेमात काम करणाऱ्या २८ कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. याबाबत कर्मचाऱ्यांनी युवा सेनेकडे धाव घेतली. युवा सेनेचे राज्य विस्तारक निखिल वाळेकर आणि माजी नगरसेवक संदीप भराडे यांनी याबाबत बिग सिनेमा प्रशासनाशी चर्चा केली. तसेच मुलांना काढून न टाकता त्यांना अन्य ठिकाणी कामावर घ्या, अशी सूचना केली. त्यावर प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत टप्प्याटप्प्याने सर्व मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा कामावर घेण्याचे मान्य केले. येत्या १५ दिवसांत सर्व मुलांना पुन्हा कामावर घेतले जाणार आहे.
-------