ग्रामपंचायत निवडणूक वादातून तरुणावर हल्ला; निवडून आलेल्या महिला सदस्यासह पती व मुलाविरोधात गुन्हा दाखल
By नितीन पंडित | Published: January 17, 2023 03:50 PM2023-01-17T15:50:38+5:302023-01-17T15:51:16+5:30
पडघा पोलीस ठाण्यात नवनिर्वाचित निवडून आलेल्या ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यासह तिच्या पती व मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न केल्याच्या संशयावरून गावातील एका तरुणाला निवडून आलेल्या महिलेने पती व मुलासह बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील खालील बुद्रुक गावात ग्रामपंचायत निकालाच्या दिवशी घडली आहे.या मारहाणीत तरुणास गंभीर दुखापत झाली असून तरुणाचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात नवनिर्वाचित निवडून आलेल्या ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यासह तिच्या पती व मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर नारायण जाधव वय ३८ वर्ष राहणार खालींग बुद्रुक असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर प्रभावती प्रभाकर जाधव, प्रभाकर बागो जाधव व कुणाल प्रभाकर जाधव असे तरुणास मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. १८ नोव्हेंबर रोजी भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या, ज्यांचा निकाल २० नोव्हेंबर रोजी जाहीर झाला होता.
या निवडणुकांमध्ये खालींग ग्रामपंचायतीच्या वतीने प्रभावती प्रभाकर जाधव या निवडणुकीत ग्राम विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवून विजयी झाल्या, मात्र विजयी झाल्यानंतर त्याच दिवशी ज्ञानेश्वर जाधव हे निवडून आलेल्या महिला सदस्याच्या घराजवळ जवळून पायी जात असताना ज्ञानेश्वर जाधव यांनी आपल्याला मतदान केले नसल्याचा संशय ठेवून प्रभाकर जाधव व मुलगा कुणाल जाधव यांनी त्यास शिवीगाळ केली. त्याचा जाब ज्ञानेश्वर जाधव यांनी विचारला असता प्रभाकर, कुणाल यांनी शिवीगाळ करत ज्ञानेश्वर यास बेदम मारहाण केली.तर निवडून आलेल्या महिला सदस्या प्रभावती यांनीही शिवीगाळ केल्याचे ज्ञानेश्वर जाधव यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरण पडघा पोलीस ठाण्यात विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर कुणाल जाधव याने ८ जानेवारी रोजी पुन्हा ज्ञानेश्वर जाधव यांस शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असून याप्रकरणी देखील पडघा पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर जाधव यांनी तक्रार दाखल केली असून या तीनही आरोपींकडून आपल्या जीवाला धोका असल्याने पोलिसांनी या तीनही आरोपींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ज्ञानेश्वर जाधव यांनी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"