इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसकडून लॉलिपॉप वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 03:01 PM2018-10-11T15:01:55+5:302018-10-11T15:03:33+5:30
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ गुरूवारी कल्याणमध्ये युवक जिल्हा काँग्रेसच्या वतीने अनोखे आंदोलन छेडण्यात आले.
कल्याण - इंधन दरवाढीच्या निषेधार्थ गुरूवारी कल्याणमध्ये युवक जिल्हा काँग्रेसच्या वतीने अनोखे आंदोलन छेडण्यात आले. युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त यांच्या नेतृत्वाखाली छेडल्या गेलेल्या आंदोलनात पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी आलेल्या वाहन चालकांना लॉलिपॉप (कॅन्डी) वाटून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. कल्याण मुरबाड रोडवरील प्रेम ऑटो परिसरात हे आंदोलन करण्यात आले. अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून निषेध नोंदवताना वाहन चालकांना पत्रकही वाटण्यात आली. ''मोदी सरकार हाय हाय, वाह रे मोदी तेरा खेल सस्ती दारू मेहँगा तेल'' यांसह अन्य घोषणा देत भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला.
सरकारचा विरोध दर्शविणारे फलकही मोठ्या प्रमाणात आणण्यात आले होते. यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसची भाववाढ करून सर्वसामान्यांना संकटाच्या खाईत लोटणा-या सरकारचा बेजबाबदार आणि निष्क्रिय असा उल्लेख करून निषेध नोंदविताना बहुत हुई पेट्रोल, डिझेल और गॅस की महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार का अंतिम संस्कार अशी पत्रकही आंदोलनकर्त्यांकडून वाटण्यात आली. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेस सर्वत्र राज्यव्यापी आंदोलन छेडत आहे.
याचाच एक भाग म्हणून जिल्हा पातळीवरही आंदोलने छेडण्यात आली. पेट्रोल आणि डिझेल हे जीएसटीच्या अंतर्गत आणावे जेणेकरून 25 ते 30 रुपयांर्पयत दर कमी होतील, आंतरराष्ट्रीय स्तरावर दर कमी असले तरी सरकारने वेगवेगळे कर-उपकर लावून दर वाढवून ठेवले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक त्रस्त आहेत. याचा निषेध तसेच इंधनाचे दर कमी व्हावेत म्हणून आंदोलन छेडत असल्याची माहिती दत्त यांनी दिली.