चाकूहल्ल्यात तरुणाचा मृत्यू, एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 05:40 AM2018-12-04T05:40:58+5:302018-12-04T05:41:04+5:30
महिनाभरापूर्वी क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाचाबाचीवरून डोंबिवली पश्चिमेत तरुणांच्या दोन गटांत रविवारी हाणामारी झाली.
डोंबिवली : महिनाभरापूर्वी क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाचाबाचीवरून डोंबिवली पश्चिमेत तरुणांच्या दोन गटांत रविवारी हाणामारी झाली. या वेळी चाकूहल्ल्यात सचिन पाटील (रा. जुनी डोंबिवली) याचा मृत्यू झाला. तर, जखमी झालेल्या सिद्धेश कुलकर्णी (२५, रा. शास्त्रीनगर) याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी सचिन कळसुलकर याला अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. घटनास्थळाहून चाकू हस्तगत केला आहे.
सचिन पाटील व रिक्षाचालक अमोल म्हस्के हे पश्चिमेतील देवी चौकाकडे रविवारी सायंकाळी दुचाकीवरून जात होते. यावेळी कुलकर्णीसह सात ते आठ तरुणांच्या टोळक्याने त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. कुलकर्णी व अमित सुर्वे यांनी सचिन पाटीलवर चाकूने हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झालेल्या सचिन पाटील याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.
४ नोव्हेंबरच्या रात्री म्हस्के हा जुनी डोंबिवलीच्या दिशेने रिक्षा घेऊन जात होता. यावेळी सुर्वे या दुचाकीस्वारासोबत ओव्हरटेक करण्यावरून बाचाबाची झाली होती. त्यानंतर, सुर्वे, कुलकर्णी, राहुल नगरे व अन्य साथीदार म्हस्केच्या घरी गेले होते. त्यावेळी यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. त्यावेळी सचिन पाटीलने मध्यस्थी केली. तेव्हा कुलकर्णीने दोघांना ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हस्केने पोलीस तक्रारीत म्हटले आहे.
म्हस्केच्या तक्रारीवरून विष्णूनगर पोलिसांनी कुलकर्णी, सुर्वे, सचिन कळसुलकर, नगरे, सुर्वे व साथीदाराविरोधात तर, कुलकर्णीच्या तक्रारीवरून म्हस्केविरोधात गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे विष्णुनगर पोलिसांनी सांगितले.