वीजेच्या धक्क्याने उपहारगृहामध्ये तरुणाचा मृत्यू; हलगर्जीपणाने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
By जितेंद्र कालेकर | Published: February 7, 2024 07:15 PM2024-02-07T19:15:51+5:302024-02-07T19:16:05+5:30
डोमिनोज कंपनीनेही यामध्ये मदतीसाठी कोणताही पुढाकार घेतलेला नाही.
ठाणे: डोमिनोज पिज्झा मध्ये साफसफाईचे काम करतांना महेश अनंत कदम (२४) या तरुणाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास घडली. त्याचा मृत्यू हलगर्जीपणाने झाल्याचा आरोप त्याच्या मित्रमंडळींसह नातेवाईकांनी केला असून त्याच्या वयोवृद्ध आईला संबंधितांनी आर्थिक मदत दयावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
राबोडी नंबर तीन येथील रहिवासी असलेला महेश हा रात्रपाळी असल्याने वर्तकनगर, नळपाडा येथील डोमिनोज पिज्झामध्ये कामावर गेला होता. तिथे ७ फेब्रुवारी रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास तो साफसफाईचे काम करीत होता. त्यावेळी वीजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे. महेश याला काम करून शिक्षण घेण्याची आवड होती. नुकतेच त्याने संगणक कोर्स पूर्ण केला होता. त्याचा दुदेर्वी मृत्यू झाला असून सीसीटीव्हीमध्ये त्याचा मृत्यू हलगर्जीपणामुळे झाल्याचे दिसत आहे. या उपहारगृहामध्ये कोणत्याही प्रकारे सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या नसल्याचे आढळून आले आहे. डोमिनोज कंपनीनेही यामध्ये मदतीसाठी कोणताही पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळेच त्याच्या वयोवृध्द आईला आर्थिक मदत मिळावी, असे महेश याचा मित्र दीपेश नलावडे यांनी मागणी केली आहे.