लोकलमधून पडून तरुण जखमी, डोंबिवली-कोपरदरम्यान घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 06:04 AM2020-01-19T06:04:09+5:302020-01-19T06:04:27+5:30
गर्दीच्या रेटारेटीमुळे लोकलमधून पडून एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी डोंबिवली-कोपर रेल्वे जलदमार्गावर घडली.
डोंबिवली : गर्दीच्या रेटारेटीमुळे लोकलमधून पडून एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी डोंबिवली-कोपर रेल्वे जलदमार्गावर घडली.
विशाल गुरव (३४, रा. पंढरीनाथ पाटील चाळ, दावडीगाव, डोंबिवली पूर्व) असे त्याचे नाव असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरव हा शनिवारी सकाळी कर्जत-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जलद लोकलमध्ये दरवाजात उभा होता. या वेळी गर्दीच्या रेट्यामुळे तो धावत्या लोकलमधून खाली पडला.
त्याच्या डोक्याला व हाताला मार लागला आहे. त्याला लोहमार्ग पोलिसांनी प्रथम महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, नंतर त्याला दावडी येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुरव जखमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी दिली. या घटनेची माहिती समजताच त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. विशाल गुरव याचा लहान भाऊ जयेश गुरवने तातडीने शास्त्रीनगर रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर, कुटुंबीयांनी विशाल याला दावडी परिसरातील खासगी रुग्णालयात हलवल्याचे पोलिसांनी सांगितले.