डोंबिवलीच्या संत सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील तरण तलावातील तुटलेल्या टाईल्समुळे युवक जखमी
By अनिकेत घमंडी | Published: June 17, 2024 08:12 PM2024-06-17T20:12:04+5:302024-06-17T20:12:13+5:30
एकप्रकारे मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
डोंबिवली: महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा फटका डोंबिवलीतील युवा तरणपटुना बसला. येथील संत सावळाराम महाराज क्रिडासंकुलातील तरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तन्मय कांबळे या (१३)वर्षीय युवकाच्या हाताला तरण तलावातील तुटलेल्या टाईल्समुळे दुखापत झाल्याचा प्रकार रविवारी संध्याकाळी घडला.
मात्र त्या ठिकाणी प्रथमेाचार बॉक्समधील औषधे चालू स्थितीत नसल्याचे डयुटीवर असलेल्या पालिकेच्या कर्मचा-यांच्या निदर्शनास आणूनही त्यांनी दखल घेतली नाही. प्रथमोपचार न मिळाल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त करीत पालिकेच्या कर्मचा-यांना जाब विचारीत धारेवर धरले. डोंबिवलीतील गोग्रासवाडी परिसरात राहणारे तन्मय कांबळे आणि शार्दूल हंकारे हे दोघे युवक रविवारी सांयकाळच्या बॅचमध्ये डोंबिवली क्रिडासंकुलातील तरण तलावात पोहण्यासाठी गेले होते.
तरण तलावात पोहोत असतानाच तरण तलावातील तुटलेल्या टाईल्सचा एक भाग तन्मयच्या डाव्या हाताला लागू तो चिरला गेला. हाताला गंभीर दुखापत झाल्याचे लक्षात येताच दोघांनीही तरण तलावातून बाहेर येत तेथील डयुटीवर असलेले कर्मचारी आणि इतर कर्मचा-यांच्या निदर्शनास आणल्याचे सांगण्यात आले. मात्र कर्मचा-यांनी तत्परतेने कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप तन्मयने केला. तेथील फर्स्ट एड बॉक्समध्ये पुरेसे औषधे नसल्याचा आरोप युवकांनी केला. त्यामुळे त्या ठिकाणी प्राथमिक कोणतेही उपचार न झाल्याने ते दोघेही रिक्षाने आपल्या गोग्रासवाडी येथील घरी आले, रविवार असल्याने डॉक्टर उपलब्ध नव्हते.
सदर प्रकार तन्मयने पालकांना सांगितल्यानंतर, त्याच्या पालकांनी तरण तलाव येथे धाव घेऊन पालिकेच्या कर्मचा-यांना जाब विचारला. पालिकेच्या गलथान कारभाराविषयी संताप व्यक्त केला. जखमी झालेल्या तन्मयावर महापालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात उपचार करण्यात आले. पालिकेच्या तरण तलावात वारंवार तरूणांना अशा दुखापतींना तरूणांना सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे एकप्रकारे मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. भविष्यात मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार केाण ? असा संतप्त सवाल पालकांनी केला. तलावाची डागडुज्जी करण्याची पालिकेची जबाबदारी आहे. तरूणांना दुखापत झाली तर त्यावर उपचार करण्याची तेथील कर्मचा-यांची जबाबदारी आहे. मात्र पालिकेच्या कर्मचा-यांचे कोणतेही लक्ष नसते. त्यामुळे पालिका आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.