नवी मुंबईतील तरुणांनी रस्ता चुकलेल्या आजींना २१ दिवसांनी पोहोचविले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 01:01 AM2021-04-23T01:01:34+5:302021-04-23T01:01:42+5:30
मूळच्या कर्नाटकमधील असलेल्या कलावती सद्य:स्थितीमध्ये माहुलगावमध्ये कुटुंबीयांसोबत राहतात. १ एप्रिलला रोजच्या सवयीप्रमाणे त्या उद्यानात फिरण्यासाठी गेल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मासुंदा मुंबईतील माहुलगाव परिसरातील कलावती मुलघे या ७४ वर्षांच्या आजी १ एप्रिलला उद्यानात चालण्यासाठी गेल्या. घराचा रस्ता विसरल्यामुळे त्या भटकत नवी मुंबईत पोहोचल्या. बुधवारी तुर्भे व इंदिरानगर परिसरातील तरुणांनी एपीएमसी पोलिसांच्या मदतीने आजींचा पत्ता शोधून काढला व तब्बल २१ दिवसांनंतर त्यांना घरी सुखरूप पोहोचविले. आजी घरात येताच कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.
मूळच्या कर्नाटकमधील असलेल्या कलावती सद्य:स्थितीमध्ये माहुलगावमध्ये कुटुंबीयांसोबत राहतात. १ एप्रिलला रोजच्या सवयीप्रमाणे त्या उद्यानात फिरण्यासाठी गेल्या. परंतु पुन्हा घरी जाताना त्या पत्ता विसरल्या. तेव्हापासून त्या विविध ठिकाणी पत्ता शाेधत फिरू लागल्या. मराठी व हिंदी बोलता येत नसल्याने त्यांना नागरिकांशी संवाद साधता येत नव्हता. बुधवारी एक रिक्षामध्ये बसून त्या तुर्भे गावात आल्या. रिक्षाचालकाने त्यांना तुर्भेत सोडून दिले. रूपेश वाडकर व अशिष पाटील, मानकेश गाडीवडार, या तरुणांनी या महिलेला एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये नेले व ती पत्ता चुकली असल्याचे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक अर्चना चिवटे व या तरुणांनी शिवसेना विभागप्रमुख महेश कोठीवाले यांच्याशी संपर्क साधला. कोठीवाले यांनी महिलेशी कन्नडमधून संवाद साधला. परंतु त्यांना पत्ता सांगता येत नव्हता. काेठीवाले यांनी होमगार्ड प्रशांत दोंडे, अविनाश शिंदे व रिक्षाचालक आशिष गुप्ता यांना सोबत घेऊन मुंबईमध्ये चेंबूर, चुनाभट्टी व इतर परिसरात पत्ता शोधण्यास सुरुवात केली.
आजींकडून जुजबी माहिती घेऊन पत्ता शोधण्यासाठी सुरुवात केली. बुधवारी मध्यरात्री हे सर्व माहुलगाव येथे पोहोचले. तो परिसर आजींना परिचयाचा वाटला. पिठाच्या गिरीपाशी घर असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांनी पिठाची गिरणी शोधली व तेथून पुढील आजींनी सर्वांना घरापर्यंत नेले. पहाटे साडेचार वाजता घराचा दरवाजा उघडला. घरातील सदस्यांनी दरवाजा उघडला व समोर आजींना पाहताच सर्वांनी रडायला सुरुवात केली. घरातील सदस्यांनी सर्वत्र शोधाशोध केली होती. पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दिली हाेती. २० दिवस होऊन गेल्यामुळे सर्व हतबल झाले होते. नवी मुंबईमधील तरुणांचे आजी व घरातील सर्वांनीच आभार मानले.
मूळ कर्नाटकमधील असलेल्या आजींना त्यांच्या कुटुंंबीयांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस, तुर्भेमधील तरुण या सर्वांनी प्रयत्न केले. चेंबूर, चुनाभट्टी परिसरात शोध घेतल्यानंतर अखेर माहुलगावमधील आजीचे घर शोधण्यात आम्हाला यश आले. आजींना त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घालून दिल्याचे समाधान वाटत आहे.
- महेश कोठीवाले, विभागप्रमुख, शिवसेना