घाटकोपरच्या तरुणाची हत्या, मृतदेह फेकला मुबई नाशिक महामार्गावर; पोलिसांनी केले आरोपी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 12:25 PM2024-08-03T12:25:51+5:302024-08-03T12:26:40+5:30
मंगळवारी सकाळी मुंबई- नाशिक महामार्गावरील कसारा बायपास लगत पुलाखालील झाडीत एक अनोळखी तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन टीम च्या सदस्यांनी कसारा पोलिसांना दिली होती.
कसारा : शाम धुमाळ
मंगळवारी सकाळी मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा बायपास जवळ एक अनोळखी मृतदेह सापडला. या प्रकरणी काहींनी पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी तपास करुन पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी सकाळी मुंबई- नाशिक महामार्गावरील कसारा बायपास लगत पुलाखालील झाडीत एक अनोळखी तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन टीम च्या सदस्यांनी कसारा पोलिसांना दिली होती. यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील बच्छाव, पोलीस उपनिरीक्षक सागर जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हा मृतदेह काही तासाभरा पूर्वी चा असल्याने कसारा पोलिसांनी तात्काळ याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली.
घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी,कर्मचारी, फॉरेन्सिक लॅब व डॉग स्कॉड यांनी भेट दिली त्या दरम्यान मयत तरुणाची हत्या करून फेकण्यात आल्याची खात्री झाल्यानंतर ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली धाटे उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी सुरेश मनोरे, कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील बच्छाव यांनी तपास कामी 3 पथक तयार केली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम व कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर जाधव यांनी संयुक्तरित्या तपास करीत मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार प्रकाश साहिल, संतोष सुर्वे, सतीश कोळी, सुनील कदम, हेमंत विभुते, विजय भोईर, स्वप्नील बोडके, गोविद कोळी यांनी घाटकोपर असल्फा व्हिलेज येथून चंद्रसेन पवार तर अंधेरी येथून हृतिक पांडे, नुरमोहंमद चौधरी अशा 3 संशयिताना ताब्यात घेतले.
यातील मुख्य संशयित आरोपी चंद्रसेन पवार याने विजय बिभीषण जाधव वय 35 याची हत्या करून मृतदेह फेकल्याची कबुली पोलिसांना दिली. आरोपी चंद्रसेन पवार याचे मयत विजय जाधव रहात असलेल्या घाटकोपर येथील घर हे मला देणार होता, अनेक वर्ष तगादा लावून देखील विजय घराचा ताबा देत नसल्याने व ते घर दुसऱ्या कोणाला देणार असल्याची माहिती मिळाल्याने त्याला अज्ञात ठिकाणी गाठून माझ्या सहकारी मित्रांच्या मदतीने विजय जाधव याचा गळा आवळून ठार केले व त्याला कसाऱ्या जवळ एका पुला खली फेकून दिला असल्याची माहिती आरोपी ने पोलिसांना दिली.