सभोवतालच्या घडामोडींमधून पडणार्या प्रश्नांची उत्तरे युवकांनी स्वतः शोधावी – दीपक राजाध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 06:00 PM2021-01-18T18:00:34+5:302021-01-18T18:00:56+5:30
Deepak Rajadhyaksha : 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधीत ठेवण्यासाठी जे अनेक मंच सक्रीय आहेत तिथे आपण बोललो नाही तरी किमान तिथे जे विचार व्यक्त होत आहेत ते ऐकणे तरी आपण नक्कीच करू शकतो.'
ठाणे : आज वंचितांच्या रंगमंचावरील मुलांनी नवे कृषी कायदे, शेतकरी आंदोलन, नवीन शिक्षण धोरण यांचा अभ्यास करून त्यांना जे समजलं ते त्यांनी नाट्य रूपाने इतकं प्रभावीपणे सादर केलं, हे बघून मला रत्नाकर मतकरींच्या वंचितांचा रंगमंच या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल्च्या दृष्टेपणाचं महत्व कळलं. आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टीवर विचार करून, त्याचा अभ्यास करून ते सादर करणं हे या मुलांसाठी मोठं शिक्षण आहे. आज इंटरनेट वर, डिजिटल मीडियावर इतकी माहिती मिळत असते, त्यातून मुलांना अनेक प्रश्न पडत असतात. त्यांनी स्वतः अभ्यास करून प्रश्नांची उत्तरं शोधावी, ही त्यांना सवय लागावी म्हणून हा रंगमंच त्यांच्यासाठी जे दिशादर्शकाचे काम करत आहे ते अत्यंत स्पृहणीय आहे, असे उद्गार कलर्स मराठी वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख आणि प्रसिद्ध नाट्य दिगदर्शक दीपक राजध्यक्ष यांनी मतकरी स्मृती मालेत बोलताना काढले.
समता विचार प्रसारक संस्था पुरस्कृत वंचितांच्या रंगमंचातर्फे त्याचे प्रणेते दिवंगत श्रेष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांना आदरांजली म्हणून प्रत्येक महिन्यात मतकरी स्मृती मालेचा कार्यक्रम घेतला जातो. हा या मालेतील सातवा कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे विश्वस्त आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ होते. प्रास्ताविक संस्थेच्या सह सचिव व एकलव्य कार्यकर्ता अनुजा लोहार यांनी केले.
दीपक राजाध्यक्ष यावेळी पुढे म्हणाले की, आज आजूबाजूला अनेक कर्ण कर्कश आवाज सगळीकडे वाढत आहे. एक प्रकारची आफुची गोळी घेतल्या सारखं अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. आज ऐकवायची नाही तर ऐकून घेण्याची गरज आहे. शेतकरी आज ज्या नेटाने लढतायत त्याला माझा सलाम. त्यांचे आंदोलन हे आफुची गोळी ठरवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून चाललाय. तो हाणून पाडायला हवा. त्यासाठी शेतकर्यांबरोबर प्रत्यक्ष सीमेवरच जायला हवे असे नाही, तर अशा प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधीत ठेवण्यासाठी जे अनेक मंच सक्रीय आहेत तिथे आपण बोललो नाही तरी किमान तिथे जे विचार व्यक्त होत आहेत ते ऐकणे तरी आपण नक्कीच करू शकतो.
भारतीय समाजकारणात महात्मा गांधीजींना टाळून पुढे जाताच येणार नाही!
महात्मा गांधीजींबाबत अनेकांचे आकर्षण शमत नाहीये. त्यांचा अभ्यासक म्हणून नाही तर एक निस्सीम चाहता म्हणून विविध कलाकृतींमधील गांधी एका मंचावर आणले तर, असे डोक्यात आले आणि त्यातून गांधीजींवरील अभिवाचनाचा कार्यक्रम साकारला, असे त्यांनी पुढे सांगितले. गांधीजींशी आपण सहमत असू किंवा असहमत. मात्र त्यांना टाळून आपण भारतीय समाजकारणात पुढे जाऊच शकत नाही. गांधी समजून घेतांना एक हत्ती आणि सात आंधळे अशी बऱ्याचदा स्थिती होते असे सांगून त्यांनी गांधीजींची त्यांना भावलेली वैशिष्ट्ये कथन केली. गांधीजी म्हणत आपले जगणे हीच आपली प्रार्थना व्हावी!
गांधीजी आज असते तर त्यांनी आपली सत्य, अहिंसा ही मूलभूत तत्वे कायम राखत कालानुरूप मार्ग जरूर बदलले असते. गांधी जरी एक फकीर होते तरी ते केवळ स्वताःत रमणारे फकीर नव्हते तर देशातील आम जनतेच्या हिताची त्यांना तळमळ होती. स्वातंत्र्या साठी प्रत्येक भारतीयाने सक्रिय व्हावे यासाठी या महात्म्याने अनेक साधे साधे पण अत्यंत भरीव अर्थ असणारे उपक्रम लोकांना दिले. स्वातंत्र्यासाठी चरखा चालवायला सांगून त्यांनी स्वातंत्र्य लढा जनतेच्या घरात पोहोचवला. पुढे मिठाच्या सत्याग्रहातून तो त्यांनी थेट स्वयंपाक घरात आणि महिलांपर्यंत पोहोचवला.
गांधीजींना मानणारे, त्यांच्या शब्दाखातर कोणताही त्याग करायला तयार असणारे त्यावेळेचे स्वातंत्र्य सैनिक आणि आजच्या सत्ताधाऱ्यांचे आंधळे भक्त यांची तुलनाच होऊ शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अखेरीस दीपक राजाध्यक्ष यांनी सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने, गांधीजींनी १८९१ मध्ये इंग्लंड येथे भारतातील विविध शेती उत्पन्ने आणि भारतातील अन्न प्रकार, यावर दिलेल्या भाषणाचे परिणामकारक अभिवाचन सादर केले. भारत हा शेती प्रधान देश आहे आणि राहील असे त्यात गांधीजी म्हणाले होते. भारतातील मांसाहारी लोकांनाही शेतीतील अन्न धान्ये रोज जेवणात हवी असतात. त्यामुळे भारतातील विविध अन्न प्रकार निर्माण करणारा अन्नदाता शेतकरी भारतात महत्वाचा असल्याचे गांधीजींनी फार पूर्वीच ब्रिटिशांना ऐकवले होते, हे राजाध्यक्षांनी यानिमित्ताने अधोरेखित केले.
मतकरींचा पोवाडा व शेतकरी आंदोलन आणि नवीन शिक्षण धोरणावर नाटिका
यावेळी वंचितांचा रंगमंचावरील कलाकारांनी दिल्ली येथे देशभरातील शेतकरी आंदोलन का करीत आहेत, त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि सरकारने त्यांना न्याय द्यायला हवा, अशा आशयाची एक प्रभावी नाटिका सादर केली. या नाटिकेत महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीविषयक विचारही फार प्रभावीपणे सादर करण्यात आले. किसन नगर च्या १६ युवक आणि महिलांना यात काम केले होते. वंचितांचा रंगमंचावरील प्रसिद्ध दिग्दर्शक विश्वनाथ चांदोरकर यांनी हि नाटिका बसवण्यासाठी विशेष मेहनत घेतली. त्याच प्रमाणे, नवीन शिक्षण धोरण कसे विषमता पोषक आणि संविधान विरोधी आहे यावर एक नाटिका सादर करण्यात आली. पंकज गुरव या कार्यकर्ता - कलाकाराने ही नाटिका बसवली होती.
ओंकार गायकवाड, अक्षता दंडवते, सुशांत जगताप, निशांत पांडे, वैष्णवी कारंडे, लता देशमुख, धीरज अडसुळे, अदिती नांदोस्कर, प्रणय घागरे, तेजाळ बोबडे, आदर्श उबाळे आदींनी या नाटिकां मधून काम केले. या दोन्ही नाटिका बसवतांना या गंभीर प्रश्नांवर मुलांनी केलेला अभ्यास आणि समाजाला काहीतरी संदेश देण्याची तळमळ दिसून आली. आणि हे सारे त्यांनी नाटिका कंटाळवाणी होऊ न देता साधले, याबाबत प्रसिद्ध रंगकर्मी सुप्रिया विनोद यांनी कलाकार - कार्यकर्त्यांचे कौतुक केले. या बरोबरच अभिषेक साळवी, सुयश पुरोहित आदी रत्नाकर मतकरींच्या चमूतील कलाकारांनी रत्नाकर मतकरी यांनी महाराष्ट्राचं चांगभलं यात बळीराजाच्या दुःख दैन्य याविषयी केलेल्या पोवाड्याचे सादरीकरण करण्यात पुढाकार घेतला. प्रसिद्ध गायक शिरीष बापट यांनी अच्युत ठाकूर यांच्या संगीत नियोजनात गायलेल्या या पोवाड्याला स्मिता टोपकर, मिताली, चैताली यांनी साथ दिली.
झूम आणि फेसबुक च्या माध्यमातून सादर केलेला हा कार्यक्रम देश विदेशातील हजारो रसिककाणी पाहिल्याचे या कार्यक्रमाचे तंत्रज्ञान संयोजक सुजय मोरे यांनी सांगितले. प्रसिद्ध गांधी अभ्यासक. लेखक, प्रकाशक रामदास भटकळ, रंगकर्मी प्रतिभा मतकरी, पंढरपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक दादासाहेब रोंगे, अमेरिकेत पीएचडी करणारे विक्रांत कांबळे, डॉ. मंजिरी मणेरीकर, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे सुधीर देसाई, आशुतोष शिर्के, सरकारी अधिकारी सुरेख पवार, साने गुरुजी बाल विकास मंदिराचे जीवन यादव, ठाण्यातील प्रसिद्ध कामगार वकील ऍड. अरविंद तापोळे, राष्ट्र सेवा दलाचे शाहीर दत्ताराम म्हात्रे, संस्थेचे जगदीश खैरालिया, लतिका सु. मो. , हर्षल कदम आदि मान्यवर उपस्थित होते.