ठाणे जिल्ह्यात तरुणाईला लसीकरणाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:44 AM2021-05-25T04:44:57+5:302021-05-25T04:44:57+5:30
ठाणे : ठाणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...
ठाणे : ठाणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. असे असले तरी दुसरीकडे अपुऱ्या प्रमाणात प्राप्त होणाऱ्या लसींच्या साठ्यामुळे लसीकरणाची चिंता वाढत आहे. त्यात १ मेपासून १८ ते ४४ वर्षीय वयोगटातील तरुणाईसह नागरिकांची लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर १५ दिवसांत ४० हजार ७१० जणांचे लसीकरण झाले होते. मात्र, अपुऱ्या लसींचा फटका या वयोगटातील लाभार्थ्यांना बसला असून त्यांचे लसीकरण थांबविण्याची वेळ आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच या आजाराने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतदेखील कमालीची वाढ झाल्याचे शासकीय आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ होत आहे. त्यात यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने आपले डोके वर काढले. अवघ्या १५ ते २० दिवसात सुरुवातीच्या काळातील नव्याने आढळणाऱ्या व मृतांच्या संख्येचा नवा उच्चांक गाठला. मृत्यूंच्या संख्येत दररोज होणारी वाढही आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी ठरत आहे. अशातच नागरिकांचे झपाट्याने लसीकरण होणे, तितकेच गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी, शासनाकडून प्राप्त होणाऱ्या अपुऱ्या लसींच्या साठ्यामुळे अनेकदा लसीकरण थांबविण्याची वेळ ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रातील आरोग्य विभागावर आली. त्यामुळे लसीकरणाबाबतदेखील चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
जानेवारी महिन्यात फ्रंट लाईन वर्कर्स, हेल्थ वर्कर्स यांची लसीकरण मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसह ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरणास प्रारंभ केला. ही लसीकरण मोहीम राबविताना लसींच्या अपुऱ्या प्रमाणात प्राप्त होणाऱ्या लसींच्या साठ्यामुळे लसीकरण केंद्रांची संख्येत दररोज होणारी चढ-उतार लक्षात घेता लसीकरण संथगतीने होत असल्याचे दिसून येत होते. अशातच शासनाने १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची मोहीमदेखील राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी अवघ्या ४० हजार ७१० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मात्र, नंतर लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे ती राबवायची कशी, असा प्रश्न आरोग्य यंत्रणांपुढे उभा ठाकला आहे.