मैदान बचावासाठी तरुणाचे पुन्हा उपोषण
By admin | Published: January 26, 2016 01:57 AM2016-01-26T01:57:53+5:302016-01-26T01:57:53+5:30
आधीच ठाण्यात खेळण्यासाठी मैदानांचा तुटवडा असताना आता आहे त्या मैदानांचाही गळा घोटण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे.
ठाणे : आधीच ठाण्यात खेळण्यासाठी मैदानांचा तुटवडा असताना आता आहे त्या मैदानांचाही गळा घोटण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. स्टेशनच्या अगदी नजीक असलेले गावदेवी मैदानदेखील आता खाजगी कार्यक्रमांसाठी आंदण देत असताना आणि तिथे सध्या एक शौचालय असताना पुन्हा दुसरे शौचालय बांधण्याचा घाट घातल्याच्या निषेधार्थ एका तरुणाने पुन्हा एकदा सोमवारपासून उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर गावदेवी मैदान आहे. या मैदानात पूर्वी जुनी भाजी मंडई होती. ती असतानादेखील येथे संपूर्ण मैदानभर विनापरवानगी पार्किंग प्लाझा सुरू होता. दरम्यान, या समस्येच्या विरोधात २००८ मध्ये राहुल शेलार या तरुणाने उपोषण केले होते. त्याची दखल घेऊन पालिकेने येथील पार्किंग कायमचे बंद केले. त्यामुळे अर्ध्या जागेत का होईना खेळाडूंना सराव करायला मिळत होता.
शेलार यांच्या उपोषणाची दखल घेताना येथे जॉगिंग ट्रॅकसह क्रीडाप्रेमींना इतरही सेवासुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालिकेने दिले होते. दुर्दैवाने आजही ती उपलब्ध झालेली नाही. मागील वर्षी पालिकेने येथील मंडई हलवून हे मैदान मोकळे केले. परंतु, तरीही येथे मैदानाच्या एका बाजूला दुचाकी पार्किंग होत असल्याने याचा त्रास सहन करावा लागत आहे. एवढे असताना आता पालिकेने ज्या ठिकाणी पूर्वी मंडई होती, त्याच ठिकाणी आता शौचालयाचे काम सुरु केले. तसेच अंडरग्राउंड पार्किंगचा प्रस्ताव आणला आहे. विशेष म्हणजे याच मैदानाच्या खालच्या टोकाला सद्य:स्थितीत एक शौचालय आहे. ते असताना पुन्हा नवीन शौचालय कशासाठी, असा ठाणेकरांचा सवाल आहे.