बदनामी केल्याप्रकरणी यूटयूब भाई सिद्धू अभंगेसह दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 10:06 PM2019-07-23T22:06:30+5:302019-07-23T22:18:49+5:30
कोपरीमध्ये यूटयूबचा भाई म्हणून कुख्यात असलेल्या सिद्धू अभंगे आणि त्याचा साथीदार अजय पासी या दोघांना कोपरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. यूटयूबवर कोपरीतील रहिवाशाची बदनामी केल्याप्रकरणी ही अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे: कोपरीतील एका रहिवाशाची फेसबुक, यूटयूब आणि व्हॉटसअॅप या सोशल मिडियावर बदनामी करणाऱ्या सिद्धू अभंगे आणि अजय पासी या दोघांना कोपरी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली आहे. या दोघांवरही हाणामारीसह सात ते आठ गंभीर स्वरुपाचे गुन्हे ठाण्यातील वेगवेगळया पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोपरीतील एका रहिवाशाला श्वानाचे तोंड आणि महिलांचे कपडे परिधान केल्याचे दाखवून ते चित्र फेब्रुवारी २०१९ मध्ये सिद्धू आणि अजय या दोघांनी टाकल्याचा आरोपी आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात आधी तक्रार अर्ज दाखल झाला होता. याचप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर विभागाने चौकशी केल्यानंतर सिद्धू आणि त्याचा साथीदार अजय यांनीच ही बदनामी केल्याचे उघड झाले. त्यानंतर याप्रकरणी संबंधिताने कोपरी पोलीस ठाण्यात २३ जुलै रोजी बदनामीसाठी बनावट दस्ताऐवज तयार करणे आणि बदनामी करणे तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांच्या पथकाने या दोघांनाही ठाणे न्यायालयाच्या आवारातून अटक केली.
सिद्धूविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे
यू टयूबचा भाई म्हणून कोपरी परिसरात कुख्यात असलेला सिद्धू पूर्वी कोपरी परिसरात वास्तव्यास होता. सध्या तो लोकपुरम परिसरात वास्तव्याला आहे. त्याच्याविरुद्ध कोपरी, वागळे इस्टेट, चितळसर, राबोडी आणि कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हाणामारी, धमकी देणे आणि खूनाचा प्रयत्न असे सात ते आठ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अगदी अलिकडेच चितळसर पोलिसांनी त्याला एका हाणामारीच्या प्रकरणातही अटक केली होती. शिवसेनेच्या व्यासपीठावरही तो अनेक कार्यक्रमांच्या वेळी वावरत असल्यामुळे बडया राजकीय नेत्यांशी आपले सलोख्याचे संबंध असल्याचा दावाही त्याच्याकडून केला जातो. त्यामुळे आपले कोणी वाकडे करणार नाही, या अविर्भावात असल्यामुळेच त्याने कोपरी परिसरात चांगलीच दहशत पसरविल्याचे बोलले जाते.