अपघातात तरुणाचा मृत्यू; पती-पत्नी जखमी, कोपरी आणि चितळसर पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 06:38 AM2017-10-26T06:38:34+5:302017-10-26T06:38:47+5:30
ठाणे : दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एकाचा मृत्यू, तर पती-पत्नी जखमी झाल्याची घटना शहरातील वेगवेगळ्या भागांत घडली.
ठाणे : दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एकाचा मृत्यू, तर पती-पत्नी जखमी झाल्याची घटना शहरातील वेगवेगळ्या भागांत घडली. या प्रकरणी कोपरी आणि चितळसर पोलीस ठाण्यांत दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबईच्या अंधेरी भागात राहणारा शंकर कीर (२७) हा २४ आॅक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावरून मुलुंड चेकनाक्याच्या दिशेने जात असताना, तो रस्त्यावर पडून जखमी झाला. त्याला काही वाहनचालकांनी तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले.
मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. आपल्याच मृत्यूला तो स्वत: कारणीभूत झाल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ३०४-अ सह मोटार वाहन कायदा १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच मृत्यू पावलेला असल्यामुळे न्यायालयात अबेटेड समरी दाखल केली जाणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक संभाजी कोर्डे यांनी सांगितले.
दरम्यान, घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ओव्हरब्रिज येथून दुचाकीवरून जाणाºया कमलेश (४१) आणि ननकी कुरील (३५) या दाम्पत्यालाही एका वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना, २३ आॅक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजताघडली. यात हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले, तर त्यांना धडक देणारा वाहनचालक मात्र अपघाताची कोणतीही माहिती न देता, पसार झाला.
या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात २४ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला असून, अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.