युवराज थेटले ठरला वर्षा मॅरेथॉनचा विजेता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 02:29 AM2019-08-12T02:29:04+5:302019-08-12T02:29:41+5:30
बाळकुम ते ढोकाळी व कोलशेत या मार्गावर रविवारी पार पडलेल्या यू थ्री मान्सून वर्षा मॅरेथॉन स्पर्धेची मुख्य १० किमीची मुलांच्या गटातील स्पर्धा युवराज थेटले, तर मुलींची स्पर्धा श्रीदेवी मेहेत्रे यांनी जिंकली.
ठाणे - बाळकुम ते ढोकाळी व कोलशेत या मार्गावर रविवारी पार पडलेल्या यू थ्री मान्सून वर्षा मॅरेथॉन स्पर्धेची मुख्य १० किमीची मुलांच्या गटातील स्पर्धा युवराज थेटले, तर मुलींची स्पर्धा श्रीदेवी मेहेत्रे यांनी जिंकली. यावेळी सांगली, कोल्हापूर आणि सातारा येथील पूरग्रस्तांना आमदार रवींद्र फाटक यांच्याकडे एक लाख एक हजार ११ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून दिला.
युनायटेड थ्री स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून ठाणे अॅथलेटिक्स असोसिएशन व महाराष्ट्र अॅथलेटिक असोसिएशनच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेला रोटरी क्लब आॅफ ठाणे अरबेनिया आणि लायन्स क्लब ठाणे यांचे सहकार्य लाभले. यावेळी ज्येष्ठ मराठी सिनेकलाकारांनी धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित होते. यू थ्री स्पोर्ट्स क्लबने ग्रीन सिटी क्लीन सिटी ही संकल्पना घेऊन या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतून गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहकार्यही करण्यात आले. यावेळी आमदार रवींद्र फाटक, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, नगरसेवक संजय भोईर, नगरसेवक भूषण भोईर उपस्थित होते. तीन गटांत ही स्पर्धा पार पडली. पहिला गट १० किमी, दुसरा गट पाच किमी आणि तिसरा गट तीन किमी अंतरासाठी रन फॉर फन असा होता. त्याचप्रमाणे विशेष मुलांसाठी एक किमी अंतरासाठी मॅरेथॉन घेण्यात आली. या मॅरेथॉनमध्ये हजारो स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला असून ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये यातूनही विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.
विजेत्यांची नावे
१० किमी मुले- प्रथम युवराज थेटले, द्वितीय दिनेश म्हात्रे, तृतीय सागर म्हसकर
१० किमी मुली - प्रथम श्रीदेवी मेहेत्रे, द्वितीय अक्षया जाडयार, तृतीय जयश्री भुयाद्रे
३ किमी महिला - प्रथम गायत्री शिंदे, द्वितीय निकिता माने, तृतीय कृतिका यादव
३ किमी मुले - प्रथम शैलेंश बेंद्रे, द्वितीय विशाल जाधव, तृतीय सुशांत कुमार
पुरु ष गटात- प्रथम तुषार, द्वितीय दिवाकर शर्मा, तृतीय नंदकिशोर सिंग
महिला गटात - प्रथम वैशाली गर्गे, द्वितीय लक्ष्मी झा, तृतीय नेहा मुलगुंड