जरीना यांनी गमावले कुटुंबातील चार सदस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 11:49 PM2020-09-24T23:49:53+5:302020-09-24T23:50:10+5:30
मुलगा सुदैवाने बचावला : आई, बहीण आणि भावासह मुलगीही पडली मृत्युमुखी
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : जिलानी इमारत दुर्घटनेत जरीना अन्सारी यांनी आई, बहीण आणि भावासह स्वत:ची मुलगीही गमावली आहे. त्यांचा २५ वर्षांचा मुलगा मात्र या संकटातून वाचला. आता तोच जरीना यांच्या जीवनाचा आधार आहे.
आलम अन्सारी हे जरीना यांच्या मुलाचे नाव आहे. आलम हा इमारतीच्या ढिगाऱ्याखाली तब्बल नऊ तास अडकून होता. आपण वाचू की नाही, याची शाश्वती आलमला नव्हती. ढिगाºयाची माती नाकातोंडात गेल्याने त्याचा आवाज निघत नव्हता. बचाव पथकाने बाहेर काढल्यानंतर आपण सुटकेचा श्वास घेतल्याचे आलम सांगत होता. जरीना अन्सारी या पटेल कम्पाउंडपासून काही अंतरावर असलेल्या टेकडीवर राहतात. आलम व त्यांची ११ वर्षांची छोटी मुलगी अफसाना ही आपल्या आजी व मामाच्या घरी जिलानी इमारतीत राहत होती.
घटनेच्या दिवशी रात्री ११ वाजता जरीना आईशी फोनवर बोलल्या आणि त्याच मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत त्यांची आई नाजमा मुरादअली कंकाली (५५), बहीण नाजिया मुरादअली कंकाली (२४), भाऊ इस्लाम मुरादअली कंकाली (३२), मुलगी अफसाना आलम अन्सारी (११) हे चार जण या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले.