विद्यार्थ्यांविना जिल्हा परिषदेची शाळा सुरू; शिक्षण विभागाचा कारभार रामभरोसे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 11:12 PM2020-01-14T23:12:41+5:302020-01-14T23:13:10+5:30
जांभूळवाडी येथील प्रकार
मुरबाड : ठाणे जिल्हा परिषदेची जांभूळवाडी येथील शाळा ही आॅनलाइन सुरू असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र बंद असल्याने ‘लोकमत’ने उजेडात आणताच शिक्षण विभाग खडबडून जागा झाला. त्यांनी तात्काळ २ जानेवारी रोजी बंद शाळेत दोन शिक्षकांची नियुक्ती केली. परंतु शाळेला विद्यार्थी मिळत नसल्यामुळे शाळेची घंटाही वाजत नसताना दोन शिक्षक हजेरी लावत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे धिंडवडे निघत आहेत.
म्हसा केंद्रशाळे अंतर्गत असणाऱ्या जांभूळवाडी या आदिवासी वस्तीतील शाळेत एकूण २३ विद्यार्थी असताना ही वाडी बारवी धरणाची उंची वाढवल्यामुळे पाण्याखाली जात असल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने शेजारी सुरक्षित ठिकाणी २५ लाख खर्च करून सुसज्ज अशी शाळेची इमारत उभारली. मात्र त्या नव्या इमारतीत परिसरातील आदिवासी पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवावे म्हणून कोणत्याही प्रकारे प्रवृत्त न केल्यामुळे त्या आदिवासी बांधवांनी आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शेजारीच असणाºया सरकारी आश्रमशाळेत प्रवेश घेतला.
दरम्यान, आपल्या शाळेला विद्यार्थी नाहीत ही संधी साधत दोन्ही शिक्षकांनी मुरबाड शहराकडे पळ काढून सर्व विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत प्रवेश घेण्यासाठी दाखले दिले. परंतु एकही विद्यार्थी नसणारी व एकदाही घंटा न वाजणारी शाळा ही बंद न दाखवता ती डिसेंबर अखेर आॅनलाइन सुरू असल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले असता ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले. गटशिक्षणाधिकारी कल्पना खरपडे यांनी या वृत्ताची दखल घेत तात्काळ त्या शाळेत दोन शिक्षकांची नियुक्ती केली. दोन आठवडे शिक्षक शाळेत हजेरी लावत असले तरी त्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेत प्रवेश घेतला आहे. सरकारने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यात सात हजार ५०० रूपये जमा केले असून त्या विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचे भोजन तसेच इतर सुविधा मिळत आहेत. गेले दोन आठवडे शाळेत विद्यार्थी नसताना व शाळेची घंटा न वाजताना शिक्षकांना शाळेत हजेरी लावावी लागत आहे. त्यामुळे या शिक्षकांना व शाळेला सध्या कुणी वाली नसल्याने शिक्षण विभागाचा कारभार हा रामभरोसे चालत असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
जांभूळवाडी शाळेतील मुले ही इतरत्र विखुरली असल्याने त्या शाळेत सध्या विद्यार्थी येत नसल्याचा अहवाल आमच्याकडे उपलब्ध असून तो अहवाल परिपूर्ण नसल्याने पुढील कार्यवाही झालेली नाही. - संगीता भागवत, शिक्षणाधिकारी, प्राथमिक.