गोवेली रुग्णालयातील समस्यांची पाहणी; जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवारांनी घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 05:58 PM2019-11-07T17:58:49+5:302019-11-07T17:59:01+5:30
गेल्या काही महिन्यांपासून गोवेली ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासत आहे.
- उमेश जाधव
टिटवाळा-: गेल्या काही महिन्यांपासून गोवेली ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासत आहे. एका महिन्यानंतर औषधे येतील तेव्हा या, किंवा बाहेरून औषधे विकत घ्या असे गोवेली ग्रामीण रुग्णालयातील औषध निर्माण अधिकारी रुग्णांना सांगत आहेत. तसेच याठिकाणी अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. याबाबतचे वृत्त लोकमत वृत्त पत्रात "गोवेली ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा" या सदरा खाली वृत्त प्रसिद्ध होताच, याची दखल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी घेत रुग्णालयाची बुधवारी पहाणी केली. येथील औषधांचा तुटवड्याबाबत चर्चा करत औषधे पुरविण्यासंदर्भात सिव्हील सर्जन कैलास पवार यांना सांगितले.
कल्याण तालुक्यातील गोवेली ग्रामीण रुग्णालयात अगोदरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जे आगोजागी घाणीचे साम्राज्य, अनेक ठिकाणी नादुरुस्ती व सुरक्षेचा प्रश्न अशा अनेक सुविधांची वानवा असताना औषधांचा तुटवडा देखील जाणवू लागल्याने रुग्णांचे हाल होऊ लागले आहेत. तालुक्यातील गोवेली ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवेचा लाभ तालुक्याच्या ग्रामीण भागातील ६८ व दहा ते बारा पाडे नागरिक, तसेच कल्याण- मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांच्या घटनेतील रुग्ण देखील याच गोवेली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले जातात. परंतु या रुग्णालयाचा कारभार म्हणजे 'रोजचे मरे त्याला कोण रडे' असा झाला असून, सिव्हील आरोग्य प्रशासन याबाबत काहीच कारवाई करत नसल्याने कोमात गेलेली आरोग्य यंत्रणा कधी जागी होणार? असा सवाल येथील नागरिक व रुग्ण करत आहेत.
या ग्रामीण रुग्णालयात गेली काही महिन्यांपासून औषधांचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्णांतून नाराजीचा सूर निघत आहे. याबाबतचे वृत्त सोमवारी लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असता, याची दखल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी घेत बुधवारी दुपारी गोवेली ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी येथे पाण्याची समस्या निदर्शनास आली. याबाबत त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठा विभागाला सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या. तसेच येथील स्वच्छता व डागडुजी करण्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभाग कल्याण यांना देखील सूचना केल्या आहेत.
गोवेली ग्रामीण रुग्णालयातील औषधांचा तुटवडा व येथील सुरक्षा या संदर्भात सिव्हिल सर्जन कैलास पवार यांच्याशी देखील फोनवरून संवाद साधत सदर समस्या लवकरात लवकर दूर करण्यासंदर्भात चर्चा केली. पवार यांनी लवकरात लवकर गोवेली ग्रामीण रूग्णालयात औषधांचा मुबलक पुरवठा करण्यात येईल तसेच सुरक्षा रक्षकां संदर्भात देखील लवकरच निर्णय घेण्यात येईल. असे सुभाष पवार यांनी सांगितले. यावेळी पवार यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्या रेखा कंठे, जयश्री सासे, कल्याण पंचायत समिती सभापती भारती टेंभे, डाॅ. योगेश कापूसकर, रवी टेंभे, रूग्णालय समीती सदस्य गणेश चोरगे आदी उपस्थित होते.