जि.प. निवडणुकीबाबत आयोगाकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:03 AM2017-09-25T00:03:03+5:302017-09-25T00:03:51+5:30
जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणरचना जाहीर करण्यात आली. यामध्ये शहापूर तालुक्यातील गट आणि गणरचना ही पूर्णपणे सदोष पद्धतीने केली आहे.
आसनगाव : जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणरचना जाहीर करण्यात आली. यामध्ये शहापूर तालुक्यातील गट आणि गणरचना ही पूर्णपणे सदोष पद्धतीने केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता केवळ लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी पडून ही गट आणि गणरचना केल्याची तक्रार आगरी क्रांती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी अधिकारी यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
गट आणि गणरचना करताना भौगोलिकदृष्ट्या सलगता असली पाहिजे, या तत्त्वाची कुठेही अंमलबजावणी करण्यात आली नसून दळणवळणाच्या सोयीसुविधा लक्षात घेतलेल्या नाहीत. अनेक ग्रुपग्रामपंचायती या वेगवेगळ्या गणांत विभागल्या गेल्या आहेत. तसेच वासिंद, कसारा यासारख्या ग्रामपंचायतीचे भविष्यात नगरपंचायतीत रूपांतर होणार आहे. या ठिकाणच्या गट तसेच गणांची रचना करताना इतर गावांचा समावेश करणे चुकीचे आहे. नव्याने करण्यात आलेल्या गट आणि गणरचनेमध्ये शहापूर नगरपंचायत वगळून गट आणि गण कायम ठेवणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता, भौगोलिक सलगता हा निकष न लावता, केवळ शहापूर तालुक्याचा नकाशा समोर ठेवून ही रचना केल्याचा आरोप त्यांनी निवेदनामध्ये केला आहे.
शहापूर तालुक्यात जिल्हा परिषद गट आणि गणरचनेत राजकीय हस्तक्षेप झाला असून भौगोलिक सलगता आणि दळणवळणाच्या दृष्टीने सोयीसुविधा लक्षात न घेता ही रचना केली असून याबाबत जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे हरकत घेतली असून विभागीय आयुक्त कोकण भवन यांच्याकडे सुनावणी होणार आहे तसेच याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडेदेखील तक्र ार केली आहे. यामध्ये समाधानकारक निर्णय न झाल्यास उच्च न्यायालयात दावा दाखल करणार आहे.
- शिवाजी अधिकारी (अध्यक्ष, आगरी क्र ांती सामाजिक संघटना)